लखनऊ | 12 ऑक्टोबर 2023 : सध्या सगळेजण मोबाईलला चिकटलेले असतात, लहान, मोठे, तरूण सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसतातच, कोणी फोनवर बोलतात, तर कोणी सर्फिंग करत असतात. एकमेकांशी बोलण्यापेक्षा फोनवर टाईमपास करण्याची सवय सध्या वाढली आहे. मात्र मोबाईलचं हे वेड लोकांसाठी घातक ठरत असून त्यामुळे अनेक दुर्दैवी घटनाही घडतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत मोबाईलवर बोलत असल्याने आई ओरडली म्हणून एक मुलीने तिचं आयुष्यचं संपवल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.
उत्तर प्रदेशच्या जालौन येथे एका अल्पवयीने मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं. गळफास लावून घेत तिने जीवन संपवलं. मात्र तिच्या या कृत्यामुळे कुटुंबियांना, विशेषत: तिच्या आईल प्रचंड मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
नक्की काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून तरुणीने आत्महत्या केली आहे. घरच्यांनी तिला अनेकदा समजावून सांगितले मात्र ती रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत होती. याप्रकरणी तिच्या आईने तिला खडसावलं होतं.
पण याच गोष्टीचा तिला खूप राग आला. आणि त्याच रागाच्या भरात तिने पुढचा-मागचा काहीच विचार केला नाही, आणि खोलीत जाऊन गळफास लावून घेतला. थोड्या वेळाने तिची आई तिला बोलवायला गेली मात्र खोलीतील दृश्य पाहून ती हबकलीच. तिची लाडकी लेक निष्प्राण अवस्थेत लटकत होती. तिच्या आईने जोरात हंबरडा फोडला. तिचं रडणं ऐकून घरातील इतर सदस्य तिथे जमले व त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून तिला खाली उतरवलं. उपचारांसाठी त्यांनी त्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
मृत तरूणीच्यांना काकांनी सांगितलं की त्यांच्या पुतणीने गळफास लावून घेतला. शेजारी राहणाऱ्या मुलाशी ती बोलायची मात्र घरच्यांनी तिला रोखलं होतं. याच रागातून तिने हे पाऊल उचललं असं ते म्हणाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून याप्रकरणी ते अधिक तपास करत आहेत.