बरेली | 26 ऑक्टोबर 2023 : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये गुंडांचे, बदमाशांचे (crime) मनोबल खूपच उंचावले आहे. तेथे गुंडाचा अक्षरश: हैदोस सुरू आहे. एका शुल्लक कारणावरून त्यांनी दुकानदारावर बंदूकीतून थेट गोळी झाडल्याचे समोर आले आहे. मात्र त्याचवेळी तो खाली वाकला आणि बचावला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण त्याच्याबाबतीत अगदी खरी ठरली. दुकानदार खाली वाकल्याने ती काच जवळच्याच कारची काच फोडून आत घुसली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चार आरोपींना अटक केली. मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दुकानदार शिवम यादव हा मूळचा बिहारचा आहे. बरेलीमध्ये सुभाष चौक येथे तो पानाचे दुकान चालवतो. त्याच्या सांगण्यानुसार, गोळीबार करणारे आरोपी रोज त्याच्या दुकानात यायचे आणि सिगारेट मागायचे. मात्र त्याचे पैसे न देताच ते सर्व निघून जायचे. असं बरेच वेळा झालं अखेर दुकानदार शिवम याने त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र या साध्याशा गोष्टीवरून ते चिडले आणि त्यापैकी एकाने खिशातून बंदूक काढून त्याच्यावर थेट गोळीच झाडली.
मात्र सुदैवाने त्याने प्रसंगावधान दाखवत डोकं खाली वाकवलं आणि ती गोळी त्याच्या शेजारी असलेल्या एका कारची काच फोडून आरपार केली. या घटनेनंतर हादरलेल्या दुकानदार शिवम याने 7 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
लालू उर्फ रॉक, ऋषभ ठाकूर, चुन्नू सौरभ आणि शंकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते नेकपूर येथील गोटिया येथील रहिवासी आहेत. मात्र अंकित यादव आणि आकाश असे उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.