मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) एका डॉक्टर महिलेचा विनयभंग (Doctor Molestation) करणाऱ्या वॉर्ड बॉयला दादर (Dadar) येथील दंडाधिकारी न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. आरोपी वॉर्डबॉयवरच महिला स्टाफच्या सुरक्षेची जबाबदारी होती. असे असताना त्याने थेट डॉक्टर महिलेचा विनयभंग केला. अखेरीस कोर्टाने आरोपीला कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पोपट भवरी (46) असे आरोपी वॉर्डबॉयचे नाव आहे. डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी कोर्टाने आरोपीला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. 2014 मध्ये हे प्रकरण घडलं आहे.
आरोपी पोपट भवरी (४६) हा BMC च्या केईएम रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. 11 डिसेंबर 2014 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने एका डॉक्टर महिलेचा विनयभंग केला.
केईएम रुग्णालयाच्या लिफ्टमधील इतर कर्मचारी आणि अन्य लोक उतरून गेल्यानंतर आरोपी भवरीने त्याच रुग्णालयातील महिला डॉक्टरशी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लिफ्ट एका मजल्यावर थांबल्यानंतर त्याने पळ काढला. त्या घटनेनंतर भवरीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सुनावणी दरम्यान कोर्टाने भवरी याला चांगलेच फैलावर घेतले. भवरी हा मुंबईतील पालिकेच्या प्रख्यात रुग्णालयात काम करत होता. या रुग्णालयात दररोज 15 ते 20 हजार नागरिक आपल्या रुग्णांना भेटायला येतात. त्यात महिला, मुलींचाही समावेश असतो. येथील कर्मचाऱ्यांना रुग्णांसाठी रात्रंदिवस रुग्णालयात थांबावे लागते. अशावेळी त्या महिलांकडे लक्ष देण्याची अथवा त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी ही वॉर्ड बॉयची असते. त्या रात्री कामावर असलेल्या डॉक्टर महिलेच्या सुरक्षेची जबाबदारीही भवरी याच्यावर होती. तसे असतानाही त्याने त्या महिला डॉक्टरचा विनयभंग केला हे अत्यंत धक्कादायक आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असताना भवरी याने केलेले कृत्य अत्यंत निषेधार्थ आहे. अशा वृत्तीला आळा घालणे गरजेचे
अशा व्यक्तींबाबत दयाळूपणा दाखविता येणार नाही, अशा विकृत वृत्तींना आळा घाळणे गरजेचे आहे. अशी मानसिकता असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे तरच महिलांवरील अत्याचारांवर आळा बसेल असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. कोर्टाने आरोपी भवरी याला दोन वर्षांची शिक्षा तसेच दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.