वर्धा : ‘माता न तू वैरणी…’ याचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना कारंजा तालुक्यातील बोंदरठाणा गावात (Wardha News) उघडकीस आली आहे. चक्क आईनेच नुकत्याच तासभरापूर्वी जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर (Wardha infant found on road) फेकलं आणि पोबारा केला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना गुरुवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी (Wardha Police) देवदुताच्या रुपात येत या नवजात बाळाला मायेचा हात दिलाय. पोलिसांनी आई बनून नवजात बालकाला ताब्यात घेत नवं आयुष्य दिलंय.ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून पोलिसांकडून माता-पित्यांचा शोध सुरु आहे. कुणी या बाळाला वाऱ्यावर सोडलं? निष्पाप मुक्या जीवाचा जीव का धोक्यात घातला? 9 महिने जो जीव पोटात वाढला, तो जन्म होतात महिलेला नकोसा का झाला? या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
‘बेटी म्हणजे धनाची पेटी’ यासारख्या अनेक म्हणी समाजात प्रचलीत आहेत. सरकारदकडूनही स्त्री-भ्रूण हत्येविरोधी आणि मुलींसाठी विविध योजनांची तरतूद केली जाते. असं असलं आजही समाजात मुलगी ही नकोशीच असल्याचा अमानुष घटना समोर येता.. मात्र, आता चक्क आपल्या तान्ह्या बाळाला आईने उकिरड्यावर फेकून दिल्याने मुलीप्रमाणेच मुलगा ही नकोसा का झाला, अशा प्रश्न उपस्थित केला जातोय. पोटच्या बाळाला फेकून देताना निर्दयी मातेला खरंच काही वाटलं नसेल का? विशेष म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर येताच या बाळाचा संघर्ष सुरु झालेला आहे, असे म्हटलं तर वावगे ठरु नये.
बोंदरठाणा येथील रहिवासी दयाराम गजाम यांचे घर गावाच्या थोड्या दूर अंतरावर आहे. त्यांची पत्नी पहाटेच पाणी भरण्यासाठी उठली असताना घराच्या मागील परिसरातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत पाहणी केली असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. अवघ्या एक तासापूर्वी जन्मलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी तत्काळ याची माहिती आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकेला दिली.
पहोटेचे 2 वाजले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नवजात बालकाला ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी निर्दयी माता-पित्यांविरुद्ध कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
गावाबाहेर असलेल्या उकिरड्यावर निर्दयी मातेने फेकून दिल्याने खळबळ उडाली. अर्भकाचे संपूर्ण शरीर मातीने भरलेले होते. नाळ ओली होती. अंगावर एकही कपडा नसल्याने बाळाचे संपूर्ण शरीर थंड पडले होते. पोलिसांनी तत्काळ अर्भकाला ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठवले. बाळ जन्मल्यानंतर त्याला आईच्या दुधाची गरज असते. पण, जन्मदात्रीच निर्दयी निघाल्याने बालकाला दूध मिळाले नसल्याने त्याची प्रकृती बिघडली.
त्याला पावडरचे दूध पाजण्यात आले. पण, बाळ दूध पित नसल्याने नवजात बाळाला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या या बाळावर उपचार सुरु आहेत.