वर्धा : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे (Vikesh Nagrale) याला आजीवन कारावासाची (Life imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल हत्या प्रकरणात विक्की नगराळेला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज हा महत्वपूर्ण निकाल देण्यात आला. दरम्यान, दोषीला फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी केली होती. मात्र, हे प्रकरण अपवादाहून अपवादात्मक नसल्याचं कोर्टानं म्हटलं आणि आरोपीला आजीवन कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती निकम यांनी दिली आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिताला जाऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मरेपर्यंत जन्मठेप होते. आज न्यायालयाने हे देखील सांगितलं आहे की आरोपी विकेशला 3 फेब्रुवारीला अटक झाली होती. तरी हा दोन वर्षाचा काळ त्या शिक्षेत गृहित धरला जाणार नाही. त्याला आजपासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगायची आहे. त्याचप्रमाणे 5 हजार रुपये दंडही त्याला द्यायचा आहे. आम्ही फाशीची मागणी केली होती. मात्र हा अपवादात्मक गुन्हा नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पण निश्चितपणे अंकिताला न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. निकालाची पूर्ण प्रत आम्हाला अजून मिळाली नाही. बचावपक्षाला हायकोर्टात जायचं असेल तर निकालाची प्रत वाचून आम्ही पुढील पाऊल उचलू, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
अंकिता पिसुड्डे हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते.
अंकिता पिसुड्डे 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले होते.
गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत अंकिताला नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला.
इतर बातम्या :