वाशिम : मुलींच्या सुरक्षेसोबत त्यांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणारेही असुरक्षित असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील (Washim crime) कारंजामध्ये (Karanja) एका वडिलांनी आपल्या मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रार (Police Complaint) दिली. कारंजा पोलीस ठाण्यात मुलीच्या छेडछाडीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, गावगुंडांनी याच्या रागातून थेट मुलीच्या वडिलांनाच मारहाण केली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असा सवालही उपस्थित केला जातोय.
मुलींची छेड काढण्याचा घटना सध्या वाढत चालल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं काही दिवसांपूर्वी एका मुलीची काही गाव गुंडांनी छेड काढली होती. मुलीची छेड काढणाऱ्या गाव गुंडांच्या विरोधात कारंजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल. मुलीच्या वडिलांनीच ही तक्रार दाखल केली होती. मात्र गावगुंडांना बंदोबस्त करणं तर दूरच उलट गावगुंडानीत मुलीच्या वडिलांनावर जीवघेणा हल्ला केलाय.
पोलिसात तक्रार दिल्यामुळे मुलीची छेड काढणाऱ्या मोहित अहेराव आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या पित्याला दोन-तीन वेळा बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.
कारंजा पोलीस जाणीवपूर्वक गावगुंडावर कारवाई करत नाही आहेत, असं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. आपली आर्थिक फसवणूक पोलिसांकडून सुरु आहे, असा सनसनाटी आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
मारहाणीची घटना घडल्यानंतर पीडितेचे वडील थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. जखमी अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलेल्या वडिलांनी आपली व्यथा मांडली आणि न्यायाची मागणी केली.
दरम्यान, आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता वाशिम पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. नेमकी या छेडछाड आणि मारहाण प्रकरणातील आरोपींवर पोलीस आता काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.