विठ्ठल देशमुख, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, वाशिम | 12 ऑक्टोबर 2023 : वाशिम शहरातील (washim city) गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढता वाढता वाढे (crime in city) असंच सुरू आहे. शहरात गुन्हेगार मोकाट सुटले असून त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात वेगेवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे घडल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीच एका शिक्षकावर पेट्रोल टाकून त्यांना जिवत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या ज्वाळेच्या जखमा अजूनही धगधगत असताना वाशिम शहरात पुन्हा एकदा क्रूर गुन्हा घडला आहे. भररस्त्यात एका इसमाला लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
वाशिम जिल्हा पुन्हा एका हत्येमुळे हादरला आहे. मालेगाव तालुक्यातील एरंडा इथे भर वस्तीत मंदिरासमोर रॉडने मारून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. गजानन असे मृत इसमाचे नाव असून ते 45 वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच याच तालुक्यातील शिक्षकावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा हत्येचे सत्र सुरू झाल्याचे दिस आहे.
ऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एरंडा गावात भर वस्तीत असलेल्या मंदिराजवळ हा हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गजानन यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गजानन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र ही हत्या नेमकी का करण्यात आली, त्याचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. लागोपाठ घडलेल्या या दोन हत्यांमुळे शहरात भीतीचं वातावरण असून हल्लेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. जवुळका पोलीस या हत्येचा अधिक तपास करत आहेत.
सोयाबीनच्या गंजीवला आग लावल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान
दरम्यान वाशिम येथून आणखी एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतातील काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी ला रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले. वाशीमच्या रिसोड तालुक्यातील सवड येथील शेतकरी माधव शेळके यांच्या शेतात दुर्दैवी घटना घडली. या आगीत त्यांचे 30 पोते सोयाबीन जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यामुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात आला असल्याने जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.