इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनविण्याच्या नादात डोहात उतरले, एकाला शोधण्याच्या नादात चौघे निघाले अन्

| Updated on: Mar 20, 2023 | 12:44 PM

इंस्टाग्राम, फेसबुकवर रिल्स बनविण्याच्या नादात अनेक तरूण आपला लाख मोलाचा जीव धोक्यात घालत असतात. अशीच एक घटना घडली असून त्यात एकाला वाचवायला जाताना चौघांनी जीव गमावला आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनविण्याच्या नादात डोहात उतरले, एकाला शोधण्याच्या नादात चौघे निघाले अन्
rajasthan
Image Credit source: socialmedia
Follow us on

चुरू : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात विचित्र घटना घडली आहे. रविवारी डोहात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरूणांपैकी एका तरूणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तिघा जणांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरूणांनी इंस्टाग्रामवर आपण पोहत असताना लाईव्ह व्हिडीओ टाकण्याच्या नादात प्राण गमावल्याचे म्हटले जात आहे. या चौघा तरूणांचे मृतदेह गावकऱ्यांनीच डोहातून तीन तासांच्या प्रयत्नांनंतर शोधून काढले.

राजस्ठानच्या चुरू जिल्ह्यातील रामसरा गावात रविवारी चार युवक पोहण्यासाठी डोहात उतरले होते. यावेळी सुरेश ( वय 21 ) याने चांगला व्हिडीओ येण्यासाठी आणखीन खोल पाण्यात उतरला. परंतू पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सुरेश बुडू लागला. त्याला बुडताना पाहून त्याचे तीन सहकारी मित्र देखील खोल पाण्यात उतरले. परंतू सुरेशसह त्याचे तीन मित्रही गंटागळ्या खाऊ लागले. आणि चौघेही पाण्याच्या वर येऊच शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेत रामसरा निवासी सुरेश नायक ( वय 21), योगेश रैगर ( वय 18 ), लोकेश निमेल ( वय 18 ) आणि कबीर सिंह ( वय 18 ) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

या मुलांचा व्हिडीओ बनविणारा त्यांचा अन्य एक मोनू नावाच्या मित्रांने गावकऱ्यांना ही बातमी सांगितल्यानंतर या तरूणाचा शोध गावकऱ्यांनी सुरू केला. जीतू प्रजापत, उमर प्रजापत, रणजीत कडवासरा, ताराचंद प्रजापत, सुभाष, ओमप्रकाश नाई आणि प्यारेलाल यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर चौघा तरूणांचे मृतदेह शोधून काढले.

लाईव्ह व्हिडीओ करण्यास सांगितले

रविवारी दुपारी लोकेश याने कॉल करून या सर्व मित्रांना डोहात अंघोळीसाठी आमंत्रण दिले होते असे घटनास्थळी हजर असलेल्या मोनू या तरूणाने सांगितले. मोनू याने अंघोळीसाठी पाण्यात उतरण्यास मनाई केल्याने त्याला त्यांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडीओ करण्यास सांगितले. तेव्हा अचानक सुरेश बुडू लागताच काठावर व्हिडीओ बनवित बसलेला मोनू प्रचंड घाबरला आणि त्याने गावकऱ्यांना बोलावले. त्यानंतर सर्व गावकरी आणि या तरूणांचे नातेवाईक घटनास्थळी जमा झाले.

मृतदेहांना गावकऱ्यांनीच शोधून काढले

या घटनेनंतर भाजपा नेते हरलाल सहारण, तसेच तहसिलदार धीरज झाझडिया, पोलिस अधिकारी घटनास्थळी जमा झाले. हरलाल सहारण यांनी या प्रकरणात प्रशासनावर टीका केली आहे. घटनास्थळी १०८ एम्ब्युलन्स एक तास उशीरा पोहचली. तसेच प्रशासनाकडे अशा प्रसंगात बचावासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. चारही मृतदेहांना गावकऱ्यांनीच शोधून काढले, प्रशासनाकडे कोणतीही मदत पथक नव्हते अशी टीका त्यांनी केली आहे.