एसी लोकलच्या ई-तिकीट सिस्टीममध्ये घुसखोरी, महिला टीसींनी उघडकीस आणली अशी चोरी, इंजिनिअर तरूण जाळ्यात

| Updated on: Jun 14, 2023 | 1:40 PM

बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारची फसवणूक केल्या प्रकरणात आरोपीला अंधेरी लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे. त्याने आणखी कोणाला तिकीटे आणि पास बनवून दिले आहेत का ? याचा तपास सुरु आहे.

एसी लोकलच्या ई-तिकीट सिस्टीममध्ये घुसखोरी, महिला टीसींनी उघडकीस आणली अशी चोरी, इंजिनिअर तरूण जाळ्यात
bogus uts tickets
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने नकली पास आधारे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या मीरारोड येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. हा सॉफ्टवेअर इंजिनिअर ( Software Engineer ) नकली पास आधारे बिनधास्तपणे सप्टेंबर 2022 पासून एसी लोकल ( Ac Local ) प्रवास करत होता. हा पास तयार करणाऱ्या या तरुणावर लोहमार्ग पोलिसांनी ( GRP ) गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम रेल्वेच्या ( Western Railway ) दक्षता पथकातील दोन महिला टीसींना संशय आल्याने हा तरूण जाळ्यात सापडला असला तर अशा प्रकारे बनावट ई-पास ओळखण्याची यंत्रणा रेल्वेकडे आहे की नाही ? असा संशय निर्माण झाला आहे.

पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने अमन नाखरानी ( 21) या मीरा रोडच्या इंजिनिअरला सोमवारी चर्चगेट ते बोरीवली दरम्यान संशयावरुन पकडण्यात आले. त्याच्याकडे 4,800 रुपयांचे दादर ते मीरा रोड दरम्यानचा एसी लोकलचा तीन महिन्यांचा बनावट यूटीएस पास जप्त करण्यात आला आहे. त्याच्या आयफोनमधून आणखी 11 युटीएस पास जप्त केले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारची फसवणूक केल्या प्रकरणात अमनला पुढील कारवाईसाठी अंधेरी लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे.

महिलांच्या टीमने पकडले

अमन याला पश्चिम रेल्वेच्या जील आणि स्नेहल पी. या दोन महिला टीसींच्या टीमने पकडले असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे या महिला टीसींचे कौतूक होत आहे. बनावट पासाआधारे इतके दिवस एसी लोकलने प्रवास करूनही तिकीट तपासनीसांच्या ही बाब कशी निदर्शनास आली नव्हती. परंतू महिला टीसींच्या चाणाक्षपणामुळे आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

पश्चिम रेल्वेचे नुकसान

आरोपी अमन नाखरानी मूळचा सुरतचा असून मीरा रोड येथे वास्तव्य करतो. त्याने सॉफ्टवेअरचा वापर करीत यूटीएस एप यंत्रणेत घुसखोरी करून हे रेल्वे पास तयार केल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर त्याने आपल्या नातलगांना देखील बनावट पास विकण्यास सुरुवात केल्याचे उघडकीस आले आहे. अमन या बनावट सिझन तिकिटांचा वापर सप्टेंबर 2022 पासून करत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे 48,000 रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच त्याने यूटीएस एपचा वापर करून 11 नातलग आणि मित्रांना बनावट पास दिल्याचे समोर आले आहे.