अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी, पुणे : गेल्या काही महिन्यांपासून कोयता हातात घेऊन हैदोस घालत काही गुंडांनी पुणे पोलिसांचे चांगलेच टेन्शन वाढवले आहे. यामध्ये अल्पवयीन तरुणांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीसांनी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली असली तरी दुसरीकडे आणखी एक टोळीचा हातात कोयता घेऊन हैदोस सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा ट्रेंडच पुण्यात सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे पोलीसांनी कठोर भूमिका घेऊन पुणेकरांना भयमुक्त वातावरण निर्माण करून द्यावे अशी मागणी आता पुणेकरांमध्ये होऊ लागली आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर 16 मधील एक घटना समोर आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांच्या हातात कोयता असल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने हातात कोयता घेऊन मध्यरात्री धिंगाणा घातला आहे, यामध्ये ठिकठिकाणी दमदाटी करून दुकाने बंद पाडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे शहरात एकीकडे पोलीस कारवाई करत असतांना दुसरींकडे नवनवीन कोयता गॅंग निर्माण होत असून त्याबाबतच्या घटना समोर येत आहे, त्यामुळे कोयता गॅंगचे पेव पुण्यातून काही केल्या कमी होत नाहीये.
गुरुवारी मध्यरात्रीच्या वेळी 17 वर्षांच्या तरुणांच्या एक टोळक्याने गाड्यांचीही तोडफोड केली आहे, कोयते तलवारी गेऊं दुकानं बंद पडली आहे, नागरिकांच्या तक्रारीनंतर मार्केट यार्ड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर खरंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले होते, मात्र काही तासातच पुन्हा पोलिसांना कोयता गॅंगने एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे पोलीसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.