गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आलं आहे. त्याला अमेरिकेच्या कॅलीफोर्नियामधून अटक करण्यात आलं. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याविरोधात दोन आठवड्यांपूर्वीच अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर अनमोल बिश्नोई हा अमेरिकेत असल्याचा वृत्ताला तेथील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता. अखेर त्याला आता अटक करण्यात आली आहे. अनमोल बिश्नोईच्या अटकेनंतर आता मुंबई पोलिसांकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अनमोल बिश्नोई हा काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात आणि अभिनेता सलमान खानच्या घरासमोर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात मोस्ट वॉटेन्ड आहे. त्याचा समावेश हा मुंबई पोलिसांकडून मोस्ट वॉटेन्ड आरोपींच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.
कोण आहे अनमोल बिश्नोई?
दरम्यान काही दिवसांपूर्वीच एनआयएकडून अनमोल बिश्नोईला पकडून देणाऱ्याला दहा लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली होती. एनआयएकडून अनमोल बिश्नोईविरोधात 2022 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याच्या बांद्रा येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात आरोपींकडून गोळीबार करण्यात आला होता, या प्रकरणाचं बिश्नोई गँग कनेक्शन समोर आल्यानंतर पोलिसांनी अनमोल बिश्नोई आणि त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.अनमोल बिश्नोईकडून सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्विकारण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात लूक आउट नोटस जारी करण्यात आली.
बारा ऑक्टोबरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात देखील अनमोल बिश्नोईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुण्यातील एक बडा नेता हा बिश्नोई गँगच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात देखील अनमोल बिश्नोई हा आरोपी आहे.त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोईला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलं आहे, मात्र तो जेलमध्ये राहून देखील अनमोल बिश्नोईच्या मदतीनं आपली गँग ऑपरेट करत होता.