अनोळखी नंबरवरून लग्नाचं निमंत्रण आलं तर वेळीच व्हा सावध, क्षणात बँक खातं होईल रिकामं, सायबर क्राईमचा नवा फंडा

| Updated on: Nov 15, 2024 | 7:22 PM

अनोळखी नंबरवरून WhatsApp वर लग्नाचे कार्ड मिळाल्यास त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे. हा एक मोठा स्कॅम आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

अनोळखी नंबरवरून लग्नाचं निमंत्रण आलं तर वेळीच व्हा सावध, क्षणात बँक खातं होईल रिकामं, सायबर क्राईमचा नवा फंडा
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

WhatsApp Wedding Card Scam : लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात एक नवा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात स्कॅमर्स तुम्हाला लग्नाचे डिजिटल कार्ड WhatsApp करतात. हे कार्ड उघडताच तुमच्या स्मार्टफोनचे संपूर्ण नियंत्रण स्कॅमर्सच्या हातात जाते. ते केवळ आपला वैयक्तिक डेटा सहजपणे अ‍ॅक्सेस करत नाही तर पुढे आपले बँक खाते देखील पूर्णपणे रिकामे करू शकतात. त्यामुळे हा स्कॅम किंवा घोटाळा नेमका काय आहे, हे जाणून घ्या आणि सुरक्षित राहा.

लग्नाचे खोटे निमंत्रण

मनीकंट्रोलच्या ताज्या रिपोर्टमध्ये हिमाचल प्रदेश सायबर पोलिसांनी या नव्या WhatsApp वेडिंग कार्ड घोटाळ्याची माहिती दिली आहे. या स्कॅमअंतर्गत तुम्हाला WhatsApp वर एका अनोळखी नंबरवरून लग्नाचं कार्ड मिळतं. हे कार्ड डाऊनलोड करताच तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस इन्स्टॉल होतो. तेव्हापासून स्कॅमर्स तुमच्या स्मार्टफोनच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवू लागतात. ते केवळ वैयक्तिक डेटा चोरू शकत नाहीत तर संपूर्ण बँक खाते रिकामे करू शकतात.

हिमाचल प्रदेश सायबर क्राईम विभागाचे डीआयजी मोहित चावला यांनी सांगितले की, ‘गेल्या काही दिवसांपासून लोक तक्रार करत होते. ज्यानंतर पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक सूचनेद्वारे लोकांना फसवणुकीच्या या नव्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. असे मेसेज आल्यावर लोकांनी घाबरून जाऊ नये, तर जरा हुशारीने वागावे.’

लिंकवर अजिबात क्लिक करू नका

अनोळखी नंबरवरून WhatsApp वर लग्नाचे कार्ड मिळाल्यास त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे. सर्वप्रथम मेसेज पाठवणाऱ्याची ओळख पटवा, त्यानंतरच तुमच्या फोनमध्ये कार्ड डाऊनलोड करा.

तक्रार कशी करावी?

सायबर क्राईम फसवणुकीची तक्रार किंवा माहिती 1930 या टोल फ्री नंबरवरून करता येणार आहे. व्हायरस पसरवण्यासाठी आणि वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी आता डिजिटल वेडिंग कार्डचा वापर केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. या गुंडांनी वेडिंग कार्डच्या नावाखाली व्हायरस फाईल्स (एपीके फाईल्स) पाठवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे फोनमध्ये व्हायरस डाऊनलोड होऊ शकतो आणि हॅकर्स तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकतात.

WhatsApp वर लग्नपत्रिका पाठवणारी व्यक्ती ओळखीची आहे का आणि फाईलचा स्त्रोत विश्वासार्ह आहे, याची नेहमी खात्री करा. अनोळखी क्रमांकावरून संशयास्पद फाईल्स येत असतील तर त्या ताबडतोब डिलीट करा.