नवी दिल्ली | 11 फेब्रुवारी 2024 : त्या बाळची आई गाढ झोपली होती. रात्री अचानक बाळाच्या रडण्याने तो जागी झाली. अर्धवट झोपत असताना तिने आपल्या लहानग्याला दूध पाजले. दुध पिऊन बाळ शांत झाले. त्यानंतर तिने बाळाला पाळण्यात ठेवले. सकाळी तिला जाग आली. तेव्हा पाळण्यात तिचे बाळ नव्हते. तिने सगळीकडे शोध घेतला. शोध घेता घेता तिला एका वस्तूमध्ये बाळाचे पाय दिसले. आई घाबरली आणि ती वस्तू उघडली आणि तिच्या पायाखालची जमीन हादरली. तिने तातडीने हॉस्पिटल गाठले पण उशीर झाला होता…
अमेरिकेतील मिसुरीमध्ये ही घटना घडलीय. आईच्या निष्काळजीपणामुळे एका लहान कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावे लागले. रात्री झोपेत त्या आईने आपल्या मुलाला कुठे झोपवते आहे हे ही तिला कळले नाही. त्या महिलेने तिच्या बाळाला झोपण्यासाठी पाळण्याऐवजी ‘ओव्हन’मध्ये ठेवले. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
मिसुरी येथील कॅन्सस सिटीच्या मारिया थॉमस असे या महिलेचे नाव आहे. रात्री झोपेत मुलाला दुध दिल्यानंतर तिने पाळणा समजून मुलाला ‘ओव्हन’मध्ये ठेवले. सकाळी तिला जाग आली तेव्हा तिला बाळ पाळण्यात दिसले नाही. तिने चुकून मुलाला ओव्हनमध्ये झोपवले होते. ओव्हन उघडताच त्यामध्ये तिचा आपले बाळ दिसले. त्यांनी तात्काळ मुलाला रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.
शवविच्छेदनामध्ये बाळाचा मृत्यू गुदमरल्याने आणि भाजल्याने झाल्याचे समोर आले. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास करत मारिया थॉमस हिला अटक केली. मुलाची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजार केले.
पोलिसांनी कोर्टासमोर सादर केलेल्या निवेदनात ‘मुलाच्या शरीरावर भाजलेल्या खुणा होत्या आणि त्याला मृत घोषित करण्यात आले असे म्हटले आहे. मात्र, ही चूक कशी झाली हे निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले नाही. ही एक अत्यंत दुःखद घटना आहे. एका मौल्यवान जीवाच्या हानीमुळे आम्ही दु:खी आहोत, असे वकील जीन पीटर्स बेकर यांनी एका म्हटले. फौजदारी न्याय यंत्रणा या भीषण घटनेबाबत योग्य ती कारवाई करेल असा विश्वास आहे असेही ते म्हणाले.