कल्याण स्टेशन परिसरातील बस स्थानकात धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पश्चिमेकडील वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस स्थानकात बसमध्ये चढताना मुद्दामहून भांडण उकरुन काढून एका त्रिकूटाने प्रवाशाचा महागडा मोबाईल हिसकावून पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कल्याण पश्चिमेकडील वाशी बस थांब्यावर नवी मुंबईमधील एक प्रवासी आणि त्याचे दोन मित्र वाशीबसमध्ये चढत होते. यावेळी तीन भामट्यांनी बसमध्ये चढत असताना हुल्लडबाजी करून एका प्रवाशाबरोबर वाद घालून भांडण उकरुन काढले. तसेच त्याच्याजवळील १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.
हेतराज प्रजापती (२२) हे कल्याणमध्ये नोकरी करतात. ते नवी मुंबईतील सानपाडा भागात राहतात. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार हेतराज आणि त्यांचे दोन साथीदार वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावरील नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या वाशी बसमध्ये चढत होते. बसमध्ये चढत असताना तीन भामट्यांनी हेतराज यांच्याशी बसमध्ये चढताना धक्काबुक्की केली आणि भांडण उकरुन काढले. हेतराज यांना दमदाटी करून तिन्ही भामट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावला. तो परत देण्याची मागणी हेतराज करू लागले तेव्हा ते तिघे भामटे बसमधून उतरून पळून गेले. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. हवालदार पी. एल. साळुंखे तपास करत आहेत.