पुणे : पुण्यातील मंचर जवळील एकलहरे गावातील घोडनदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी दोन सख्ख्या बहिणी गेल्या होत्या. त्यावेळी एका मुलीचा पाय घसरून ती खोल पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी या दोघी बहिणींनी जीवावर उदार होऊन पाण्यात उडी मारली खरी परंतू बुडणारी मुलगी सुदैवाने वाचली आणि या दोघी बहिणींचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मुंबईच्या रहीवासी असलेल्या प्रिती शाम खंडागळे ( वय 17 ) आणि आरती शाम खंडागळे ( वय 18) या दोघी सख्ख्या बहीणी गावी उन्हाळी सुट्टी निमित्त फिरायला गेल्या होत्या. मंचरच्या एकलहरे गावातील घोडनदीत त्या कपडे धुवायला शेजारी आणि पाजरी राहणाऱ्या महिला आणि मुलींसोबत गेल्या होत्या.
आरती आणि प्रीती या बर्थडे निमित्त गावी आल्या होत्या. बुधवारी रात्री बर्थडे पार्टी झाली. सकाळी कपडे धुण्यासाठी पाच जणी घोड नदीच्या काठावर गेल्या होत्या. नवीन पुलाजवळ त्या कपडे धुत होत्या. त्यांच्यातील एकीचा पाय घसरून ती नदीच्या पाण्यात पडली. ती बुडत असल्याचे पाहून आरती आणि प्रिती या दोघी बहीणी तिला वाचवायला पाण्यात उतरल्या. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघी बुडाल्या.
मात्र, जिला वाचविण्यासाठी या दोघी बहिणी पाण्यात उतरल्या ती १२ वर्षांची मुलगी सुदैवाने वाचली. आरती आणि प्रितीला वाचविण्यासाठी इतर मुलींनी प्रयत्न केले. परंतू त्यांच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागल्याने त्या माघारी फिरल्या. काठावरील महिलांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने काही तरूणांनी नदीकाठी धाव घेत पाण्यात उड्या मारल्या. पाण्यातून या दोघींना बाहेर काढले. त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या दोघींना तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत केले.