निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल हत्या करण्यात आली. मॉरीस भाई नावाच्या गुंडाने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावलं. तिथेच फेसबुक लाइव्ह केलं. यावेळी दोघांनीही दोघांमधील वाद मिटल्याचं सांगितलं. पण त्यानंतर अचानक मॉरीसने अभिषेक यांच्यावर धाडधाड गोळ्या घातल्या. त्यामुळे अभिषेक जागीच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तर, अभिषेक यांच्यावर गोळ्या घातल्यानंतर मॉरीस भाईने स्वत:वरही गोळ्या घातल्या आणि जीवन संपवलं. त्यामुले खळबळ उडाली आहे. मॉरीसभाईने स्वत:ला का संपवलं? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
मॉरीसभाई आणि अभिषेक घोसाळकर यांचं कार्यालय बाजूबाजूलाच आहे. दोघांमध्येही फारसं जमत नव्हतं. मॉरीसभाईने काल अभिषेक घोसाळकर यांना हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. त्यामुळे अभिषेक हे सर्व वाद विसरून त्यांच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमाआधी मॉरीसभाई अभिषेक यांना आपल्या कार्यालयात घेऊन गेले. तिथे फेसबुक लाइव्ह करण्यात आला होता. दोघांनीही फेसबुक लाइव्हवरून संवाद साधला होता. सर्व वाद मिटल्याचं म्हटलं होतं. आता दोघे मिळून काम करू असंही दोघांनी सांगितलं. पण मॉरीसभाईच्या मनात काही औरच होतं.
अन् गोळ्या घातल्या
मॉरीसभाईने फेसबुक लाइव्हवरून संवाद साधल्यानंतर जागेवरून उठला. अभिषेकही फेसबुकल लाइव्हवर बोलल्यानंतर उभे राहिले. अभिषेक उभे राहताच त्याचा फायदा घेऊन मॉरीसभाईने अभिषेक यांच्यावर धाड धाड गोळ्या घातल्या. काही कळायच्या आत अभिषेक घोसाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तात्काळ करुणा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच अभिषेक यांनी जगाचा निरोप घेतला.
स्वत:वरही गोळी झाडली
अभिषेक यांना माारल्यानंतर मॉरीस याने स्वत:वरही गोळ्या घातल्या. त्याने स्वत:वर चार गोळ्या घातल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मॉरीसने स्वत:वर गोळ्या का घातल्या? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कारवाईच्या भीतीने आणि चौकश्यांचा सिसेमिरा नको म्हणून मॉरीसने स्वत:ला संपवल्याचं सांगितलं जात आहे. तशी परिसरात चर्चाही आहे. मात्र, मॉरीसने स्वत:ला का संपवलं याची छडा लावण्याचं काम पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासातूनच सत्य बाहेर येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.