जयपूर : पती-पत्नीचं नातं (relation of husband and wife) विश्वासावर आधारलेलं असतं. पण त्यातच जर विश्वासघात झाला, तर संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी होते. राजस्थानमध्येही असाच एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. तेथे एक महिला तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त (birthday surprise) त्याला सरप्राईज देण्यासाठी गेली होती, मात्र तिथे तिला जे दृष्य दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्नी शहरात पोहोचली तेव्हा तिचे डोळे पाणावले. कारण तेव्हा नवरा दुसऱ्याच स्त्रीसोबत त्याचा वाढदिवस साजरा करत होता. पतीने दिलेल्या या धोक्यामुळे ती कोसळून पडली. ते दृश्य पाहून महिलेने तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि ती तिथून रडत रडत निघाली. ती रेल्वे स्टेशनवर आली आणि तिथेच तिने दोन मुलांसह ट्रेनसमोर उडी मारून आपले जीवन संपवले.
मथानिया येथील रहिवासी असलेले सुरेश हा जोधपूरमध्ये टॅक्सी चालवतो आणि एका भाड्याच्या खोलीत रहात होता. 2 जुलैला सुरेशचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने पतीला सरप्राईज देण्यासाठी त्याची पत्नी बिरमा देवी ही तिच्या दोन मुलांसह जोधपूरमध्ये आली. सकाळी आठच्या सुमारास ती त्याच्या घरी पोहोचली, मात्र समोरचे दृष्य पाहून तिचे डोळेच विस्फारले. कारण तिचा पती एका दुसऱ्या महिलेसोबत वाढदिवस साजरा करत होता. पतीचे हे विवाहबाह्य संबंध कळताच संतापलेल्या बिरमाने त्याला खूप सुनावले आणि ती मुलांसह परत गावी जाण्यासाठी बसमध्ये बसली.
पतीने केलेल्या या कृत्यामुळे तिला खूपच वाईट वाटलं, ती धाय मोकलून रडत होती. तिला हा धोका सहनच झाला नाही आणि प्रवासात मध्येच खाली उतरली. मंडलनाथ रेल्वे स्थानकाजवळ उतरून ती रेल्वे रुळाच्या दिशेने निघाली. अखेरत तिथेच तिने आपल्या दोन मुलांसह ट्रेनसमोर उडी मारून आयुष्य संपवलं.
जोधपूरला जाण्यापूर्वी ती पतीला सतत फोन करत होती, पण त्याने फोन न उचलल्याने तिने त्याची अचानक भेट घेण्याचे ठरवले. त्याचा वाढदिवस मात्र तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला.
दुसरीकडे या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुरेश व त्याच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा पोलिस कसून शोध घेत आहेत.