मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांच्या विरोधात जात पडताळणी प्रकरणात दाखल गुन्हा आहे. यासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयात दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. मात्र त्या अर्जावर 21 डिसेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस या दोघांनी त्यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातून दोषमुक्ती करण्यात यावी, याकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या अर्जावर आज निकाल अपेक्षित होता. मात्र काही करणास्तव आज निर्णय झाला नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे 21 डिसेंबर रोजी निर्णय देणार आहेत.
नवनीत राणा आणि वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांनी या गुन्ह्यातून दोषमुक्ती करण्यात यावी, म्हणून त्यांनी मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज मुलुंड न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळं त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
नवनीत राणा यांच्या विरोधात भादंवी कलम 420, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर नवनीत राणा यांचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहेत. राणांवर अनुसूचित जातीचा दाखल मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. नवनीत राणा या तेथून विद्यमान खासदार आहेत.
नवनीत राणा यांच्या वतीने वकिलाने दोन अर्ज दाखल केले. एका अर्जाद्वारे त्यांनी सूट मागितली. दुसऱ्याद्वारे त्यांनी स्थगिती मागितली. जात प्रमाणपत्र प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत दंडाधिकारी न्यायालयाने आरोप निश्चित करण्यास पुढे जाऊ नये असे राणा यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितलं होतं.