प्रेमात पडलेली व्यक्ती प्रेमासाठी काहीही करू शकते. काहीवेळा स्वत:चा जीव देऊ शकते पण प्रसंगी दुसऱ्याचा जीव धोक्यातही घालू शकते. असाच काहीसा प्रकार वसईमध्ये घडल्याचे उघडकीस आलंय. चित्रपट मालिकांमध्ये अभिनय करता करता एक महिला प्रेमासाठी स्वत:च व्हिलन बनली. ज्याच्यावर प्रेम होत त्याच्याच घरच्यांना त्रास देऊ लागली. या प्रेमाच्या खेळात तिने चक्क साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला वेठीस धरलं आणि त्याचं अपहरण केलं. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे त्या मुलाचा अवघ्या काही तासांतच शोध लागला आणि तो सुखरुपपणे आई-वडिलांकडे आला. याप्रकरणी पोलिसांनी सबरीन शेख या महिलेला अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिच्यासोबत सामील असलेली दुसरी आरोपी महिला अद्याप फरार असून तिचा शोध घेण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, सबरीन शेख असे आरोपी महिलेचे नाव असून, सिंघम, क्राईम पेट्रोल अशा चित्रपट तसेच मालिकेत तिने साईड ॲक्टर म्हणून काम केले आहे. सबरीने हिचे ब्रिजेश ( वय 25) याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या लग्नास ब्रिजेशच्या आई-वडिलांचा नकार होता, याचाच राग सबरीनच्या मनात धुमसत होता. त्याच रागातून तिने एक प्लान आखला. त्यांना धडा शिकवण्यासाठी सबरीनने त्यांच्या घरातील अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला वेठीस धरलं.
वसईमध्ये हवाईपाड्याच्या अब्दुल रेहमान चाळीत दिनेश गौतम हे त्यांची पत्नी प्रिती व दोन्ही मुलांसह राहतात. त्यांचा मुलगा साडेतीन वर्षांचा प्रिन्स हा त्याच्या बहिणीसोबत शनिवारी 9.30 वाजता त्याच परिसरातील सक्सेस क्लासेसला शिकवणीसाठी गेला होता. मात्र 10.15 च्या सुमारास आरोपी महिला तेथे आली, आणि तिने त्याच्या क्लासमध्ये कारण देत त्या मुलाला बाहेर बोलावले. त्याला औषध द्यायचं आहे, त्याच्या आईने बोलावलंय असं कारण सांगत आरोपी महिला त्याला क्लासमधून घेऊन गेली आणि त्याचं अपहरण केला.
11 वाजता क्लास सुटायची वेळ झाल्यावर प्रिन्सची आई त्याला क्लासमधून घेण्यासाठी आली, मात्र तेव्हा तो तिथे नव्हताच. त्यांनी तेथे चौकशी केली असता, एक महिला तुमचचं नाव सांगून तुमच्या मुलाला घेऊन गेली असा एका शिक्षिकेने त्यांना सांगितलं. ते ऐकून त्याच्या आईला मोठा धक्काच बसला. तिने आजूबाजूला खूप शोधलं, पण मुलगा काही सापडलाच नाही. कुटुंबियांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकासह 5 वेगवेगळे पथक तयार करून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा 4 तासात छडा लावण्यात यश मिळवले.
सीसीटीव्हीच्या आधारे त्यांनी त्या महिलेला शोधलं. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सचिन सानप यांनी आरोपी महिलेला बांद्रा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अपहरण केलेल्या प्रिन्सला नायगांव येथे एका नातेवाईकाकडे ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या एका टीमने नायगांव येथून प्रिन्सला ताब्यात घेत अपहरणाच्या गुन्ह्याचा उलगडा केला. प्रेमासाठीच आपण हे कृत्य केल्याचं आरोपी महिलेने कबूल केलं. पोलिसांनी तिला अटक केली असून दुसऱ्या महिलेचा शोध सुरू आहे.