मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करत एका तरूणीची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पोलीस अधिकाऱ्यांचे नाव वापरून कारवाई करण्याची धमकी या तरूणीला देण्यात आली होती. त्यानंतर तिच्या खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेऊन या तरूणीला कारवाईची भीती दाखवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी (वय 31) ही मूळची अहमदाबाद येथील रहिवासी आहे. ती एक इंजिनीअर असून तिचे पती उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार महिला गोरेगावमधील एका खासगी कंपनीत 2018 सालापासून उपाध्यक्ष पदावर नोकरीला आहे. कामानिमित्त महिन्यातून चार-पाच वेळा तरी ती मुंबईत येत असते.
तिने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी ती कामानिमित्त कंपनीत आली होती. 7 तारखेला दुपारच्या सुमारास तिला एक कॉल आला. आपण इंटरनॅशनल कुरियरच्या कार्यालयातून बोलत असल्याचे फोनवरील व्यक्तीने सांगितले. आधार कार्डच्या गैरवापराबाबत तक्रार करण्यात आली आहे, असे त्याने नमूद केले. त्यानंतर संशयित आरोपीने पुन्हा फोन केला आणि आपण सायबर कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत ओळखपत्र पाठवले. बँकेत किती खाती आहेत, याची चौकशी केली. तसेच एक कोड पाठवून काही रक्कम पाठवल्यास बँक खात्यातील रक्कम कायदेशीर आहे की नाही ते कळवू असे सांगत तिच्याकडून पैसे उकळले. असे करत-करत विविध कॉलच्या माध्यमातून तिच्याकडील सुमारे 5 लाख आरोपीने लुटले.
रात्री तिने पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर, कोणताही अधिकारी असा पैसे पाठवायला सागत नाही, असे त्याने स्पष्ट केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि त्या तरूणीने वनराई पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
रक्षकच बनले भक्षक, महिला पोलिसांचा छळ करणाऱ्या पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा
कायद्याचे आणि नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते तेच भक्षक बनल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच महिला पोलिसाचा छळ केल्याचा गंभीर प्रकार ॲन्टॉप हिल परिसरात घडल्याचे उघड झाले. पीडित महिला अधिकारी ही मूळची कल्याणची रहिवासी असून ती मुंबई पोलीस दलात कर्तव्यावर आहे.
सदर महिला ॲन्टॉप हिल परिसरात गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी असताना आरोपी पोलीस शिपायाने समाज माध्यमावरून तिला मानसिक त्रास दिला, असा आरोप तिने लावला आहे. तसेच महिलेसह तिच्या पतीची बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. एवढेच नव्हे तर आरोपीने अनेकदा अश्लील वक्तव्यही केला, असा आरोपही महिलेने केला. 21 सप्टेंबर 2023 ते 27 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान ही घटना घडली. आरोपी शिपायाकडून धमकी येणे, तसेच छळ वाढल्याने अखेर त्या महिलेने त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करीत आहेत.