मुंबई: कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतरित करण्यात आलेल्या अंधेरीतील एका हॉटेलमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने शहरातील हॉटेल्सचे रुपांतर कोव्हिड सेंटरमध्ये (Coivd centre) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे शासनाचे पूर्णपणे नियंत्रण नसलेल्या या हॉटेल्समध्ये महिला कितपत सुरक्षित राहतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ( Molestation of coronavirus positive women in covid centre in Mumbai)
प्राथमिक माहितीनुसार, अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्याला ( मेडिकल कोऑर्डिनेटर) पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित महिला ही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे अंधेरीच्या विट्स हॉटेलमध्ये क्वारंटाईन होती. या महिलेचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असून याच हॉटेलमध्ये वास्तव्याला होते.
मात्र, महिलेचा पती आणि सासूला जास्त त्रास जाणवायला लागल्याने त्यांना पनवेलच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ही महिला हॉटेलमध्ये तिच्या मुलांसोबत राहत होती. तेव्हा हॉटेलमध्ये असणाऱ्या एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले.
तुला क्वारंटाईनमधून मुक्त करु असे सांगत या वैद्यकीय कर्मचाऱ्याने महिलेची छेड काढली. तिच्या हाताचे चुंबन घेतले. त्यानंतर पीडित महिलेला आलिंगन देण्यासाठी जबरदस्ती केली. या प्रकारामुळे संतापलेल्या महिलेने वैद्यकीय कर्मचाऱ्याला तिथून निघून जाण्यास सांगितले.
त्यानंतर महिलेने पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहेत. तर आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका शहरातील पंचतारिकांत हॉटेल्स ताब्यात घेणार आहे. या हॉटेल्सचे रुपांतर कोव्हिड सेंटरमध्ये करण्यात येईल. याठिकाणी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी केला जाईल. तसेच या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही पंचताराकित हॉटेल्सचं कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात येणार. खासगी डॉक्टरांकडे ही केंद्र चालवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार.
संबंधित बातम्या:
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग, कोव्हिड सेंटर्ससाठी BMC पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार
प्रसिद्ध पार्श्वगायिकेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, ‘गायिका’ मावशी-‘संगीतकार’ काका अटकेत
( Molestation of coronavirus positive women in covid centre in Mumbai)