बंगळुरू | 6 ऑक्टोबर 2023 : महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे करूनही अत्याचारांना आळा बसताना दिसत नाही. अजूनही महिलांविरोधातील गुन्हे कमी न होता, दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. देशात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार, त्यांना त्रास देणे, विनयभंग असे प्रकार घडतच राहतात. बंगळुरूमध्ये देखील असाच एक प्रकार घडला असून रॅपिडो ड्रायव्हरने नकोसा स्पर्श करत जवळीक साधल्याने एक तरूणी भेदरली . तिने सरळ पोलिसांकडेच धाव घेतली.
बेंगळुरूमधील एका 20 वर्षीय महिलेने रॅपिडो बाईक-टॅक्सी (rapido rider) स्वाराच्या विरोधात लैंगिक छळाची (physical harassment) तक्रार दाखल केली आहे. या ड्रायव्हरने 30 सप्टेंबर रोजी त्या तरूणीसोबत अनुचित वर्तन केले होते. तिच्या तक्रारीनंतर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कसून शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
आपबिती केली कथन
त्या तरूणीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही राईड तिच्या कॉलेजपासून सुरू झाली आणि घरापाशी थांबली, मात्र त्याच प्रवासादरम्यान रायडरने महिलेला अयोग्यरित्या स्पर्श केला. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास तिने बाईक राईड सुरू केली आणि पुढल्या 20 मिनिटांमध्ये रॅपिडो ड्रायव्हर मूळ रस्ता सोडून दुसरीकडेच भरकटला. तो तिला सतत तिचं नावं, ती काय तरते आणि कुठून आली आहे ( मूळ गाव) याबद्दल प्रश्न विचारत तिची चौकशी करत होता. पूर्ण प्रवासात ती शांत बसली होती, तरीही त्याने आक्रमकपणे प्रश्न विचारणे सुरूच ठेवले.
जबरदस्ती दिला मोबाईल नंबर
अखेर प्रवास संपवून ते तिच्या घराजवळ पोहोचले, तेव्हा त्या तरूणीने पेमेंट करण्यासाठी रायडरकडे स्कॅनर मागितला. मात्र त्याने तिला स्कॅनर न देता, तिला एक मोबाईल नंबर सांगितला आणि त्यावर पेमेंट करण्याची रिक्वेस्ट केली, असे तरूणीने तिच्या तक्रारीत नमूद केले. तिच्या तक्रारीच्या आधारे बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या रॅपिडो ड्रायव्हरचा शोध सुरू केला.
रॅपिडोने जाहीर केले निवेदन
हे प्रकरण उजेडात आल्यानंतर रॅपिडो कंपनीने एक निवेदन जाहीर केले आहे. “ नुकतीच ही तक्रार मिळाल्यानंतर, आम्ही त्वरीत तपास सुरू केला. आणि हे गैरकृत्य करणाऱ्या त्या संबंधित रायडरला कायमचे निलंबित केले आहे. या विशिष्ट प्रकरणात, कायदेशीर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी आमचा पीडित प्रवाशाला पाठिंबा आहे.
तिने ही केस पुढे नेण्याचे ठरवल्यास तिला मदत करण्यास आम्ही तत्पर राहू,” असेही कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे.