प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराकडे जायचं म्हणून तिने वाटेत अडथळा बनणाऱ्या पोटच्या गोळ्यालाच….

| Updated on: Jul 03, 2023 | 11:47 AM

एका विवाहीत महिलेने स्वत:च्याच मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या अडीच वर्षांच्या मुलाला संपवताना त्या महिलेने जराही दया दाखवली नाही, मात्र तिने हे का केले, याचे कारण तर आणखीनच धक्कादायक आहे.

प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराकडे जायचं म्हणून तिने वाटेत अडथळा बनणाऱ्या पोटच्या गोळ्यालाच....
नागपूरमध्ये निवासी महिला डॉक्टरची छळवणूक
Follow us on

सूरत : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी… आई म्हणजे देवाचं दुसरं रूपच… आईच्या प्रेमाचे वर्णन करणाऱ्या अनेक म्हणी, अनेक वाक्य आपण आत्तापर्यंत ऐकली असतील. पण गुजरातमध्ये आईच्या प्रेमावरचा (mother killed son) विश्वासच उडून जाईल अशी धक्कादायक घटना घडली आहे. तेथे एका महिलेने आपल्याच पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

गुजरातमधील सुरत शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नयना असे महिलेचे नाव आहे. आपलं अडीच वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन नयनाने प्रथम पोलिस स्टेशन गाठले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सलग तीन दिवस मुलाचा शोध घेतला, मात्र मुलगा कुठेच सापडला नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, बेपत्ता मुलाची आईच संशयाच्या भोवऱ्यात आली. यानंतर पोलिसांनी नयनाची चौकशी करत तिलाट अटक केली.

खरंतर, अडीच वर्षांचा हा मुलगा 27 जूनपासून बेपत्ता होता. सुरतच्या दिंडोली भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करणाऱ्या नयनाने, वीर हा आपला अडीच वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचा तपास सुरू केला.

सीसीटीव्हीद्वारे घेतला शोध

नयना ही जिथे मजूर म्हणून काम करत होती त्या बांधकामाच्या जागेसह आसपासच्या परिसरात शोध घेण्यात आला. त्यासाठी पोलिसांनी तिथले सीसीटीव्ही फूटेजही तपासले, मात्र तो लहान मुलगा कुठेच बाहेर जाताना दिसला नाही. त्यामुळे तो मुलगा कन्स्ट्रक्शन साईट सोडून कुठेच बाहेर पडल्या नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी नयनाकडे मुलगा कधी, कुठून, कसा बेपत्ता झाला याबद्दल सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाच्या शोधार्थ डॉग स्क्वॉडचीही मदत घेतली असते, तेही कन्स्ट्रक्शन साईटच्या बाहेर गेले नाहीत.

प्रियकरावर लावला खोटा आरोप

दरम्यान, झारखंडमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच आपल्या मुलाचे अपहरण केल्याचा संशयही नयनाने पोलिसांसमोर व्यक्त केला. त्यानंतर पोलीसांनी तत्काळ तिच्या प्रियकराशी संपर्क साधला, एवढंच नव्हे तर त्याचं लोकेशनही ट्रेस केले, मात्र सुरतजवळ कुठेही त्याचे लोकेशन ट्रेस झाले नाही. तो कधीच सुरतला आला नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यामुळे महिलेचा आणखी एक खोटारडेपणा पोलिसांसमोर आला.

पोलिसी खाक्या दाखवताच सत्य आले समोर

तो मुलगा कन्स्ट्रक्शन साईट सोडून बाहेर गेला नाही तर अखेर गेला कुठे असा प्रश्न पोलिसांना पडला. अखेर पोलिसांचा त्या मुलाच्या आईवर संशय बळावला. त्यांनी तिची कठोरपणे चौकशी केली असता, त्या महिलेनेच आपल्या स्वत:च्या मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.

मृतदेह कुठे लपवला

हत्येनंतर मुलाचा मृतदेह खड्ड्यात पुरल्याचे नयनाने प्रथम सांगितले. मात्र तिथे शोध घेतला असता तिथे काहीच मिळाले नाही. त्यानंतर महिलेने घूमजाव केले आणि सांगितले की मृतदेह तलावात फेकला. मात्र तेही खोटं असल्याचं स्पष्ट झाल्याावर तिला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. तेव्हा अखेर महिलने सत्य कबूल करत मुलाचा मृतदहे कन्स्ट्रक्शन साईटवरील टॉयलेटसाठी बनवण्यात आलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे पुन्हा शोध घेतला असता अखेर मृतदेह मिळाला.

का केले हे निर्घृण कृत्य ?

आपल्या मुलाची हत्या का केली असे नयनाला विचारण्यात आले असता तिने तिच्या प्रियकराचे कारण पुढे केले. नयना ही मूळची झारखडंची असून तिथे तिचा एक प्रियकर आहे. मात्र त्याने तिला तिच्या मुलासह स्वीकारण्यास नकार दिला. प्रेमाच्या वाटेत अडथळा बनणाऱ्या लहान मुलाचा नयनाने म्हणूनच काटा काढला.