कानपूर : अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या हव्यासातून पत्नीने पतीसह सासऱ्याला औषधांचा ओव्हरडोस देऊन संपवल्याची धक्कदायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकरासह चौघांना अटक केली आहे. सपना असे आरोपी महिलेचे तर राजू गुप्ता असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. विशेष म्हणजे क्राईम सिरियल पाहून महिलेला ही हत्येची आयडिया सुचली. याआधीही महिलेच्या प्रियकराने तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला होता. मात्र सुदैवाने तो यातून बचावला होता.
सपनाचे कृष्णा नगर येथील रहिवासी राजू गुप्ता याच्याशी प्रेमसंबंध होते. सपनाला पतीपासून सुटका मिळवायची होती. मात्र त्यासोबतच तिचा पतीच्या संपत्तीवरही डोळा होता. सपनाचा पती ऋषभच्या नावे अनेक प्रॉपर्टी आहेत.
राजूने आधी ऋषभवर जीवघेणा हल्ला घडवून आणला होता. मात्र ऋषभ यातून बचावला. त्यानंतर सपना त्याला औषधांचा ओव्हरडोस देत होती. यामुळे त्याची तब्येत बिघडत गेली आणि त्याचा मृत्यू झाला.
सपनाचे शेजारी राहणाऱ्या विश्वकर्मासोबत पैशांच्या व्यवहारातून वाद होते. यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी आणि आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी सपनाने ऋषभवरील हल्ल्याला विश्वकर्मा जबाबदार असल्याचे पोलिसांना सांगितले होते.
सपनाला औषधे देणाऱ्या मेडिकल स्टोरवाल्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र प्रिस्क्रिप्शन पाहूनच सपनाला औषध दिल्याचा दावा मेडिकलमधील कर्मचाऱ्यांनी केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.