कल्याण / सुनील जाधव : पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये आज पहाटे एका महिलेचा व्हिडिओ काढत छेडछाड करण्याचा प्रकार घडला. महिलेने गोंधळ घातल्यानंतर प्रवाशाने व्हिडिओ काढणाऱ्या इसमाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मोहम्मद अश्रफ असे छेडछाड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलेने आरडाओरडा केल्याने इतर प्रवाशांनी आरोपीला रंगेहाथ पकडले. यानंतर प्रवाशांनी आरोपीला महाप्रसाद दिला.
सदर महिला सिंहगड एक्सप्रेसने पुण्यावरून मुंबईला आपल्या नातेवाईकासह माहेरी येत होती. यावेळी चालत्या एक्सप्रेस गाडीमध्ये एक व्यक्ती प्रवासादरम्यान तिचा व्हिडिओ बनवत तिला धक्का मारत होता. आरोपी आपल्याशी छेडछाड करत असल्याचे लक्षात आले. बराच वेळ आरोपी हे कृत्य करत होता. अखेर महिला संतापली आणि एक्सप्रेस गाडीमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
महिलेचा गोंधळ ऐकल्यानंतर डब्यात असलेल्या सर्व प्रवाशांनी व्हिडिओ काढणाऱ्या त्या विकृत प्रवाशाला व्हिडिओ काढताना रंगेहाथ पकडले. मग प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली. अखेर ट्रेनमध्ये असलेल्या टीसीने धाव घेत प्रवाशांच्या तावडीतून आरोपीची सुटका केली. यानंतर टीसीने पोलिसांना फोन करून आरोपीच्या पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपीला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. सध्या याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.