रविवारी देशभरात करवा चौथचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी महिला हा उपास करतात. मात्र याच दिवशी उत्तर प्रदेशातील कौशंबी येथे एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले. तेथे एका महिलेने पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत दिवसभर त्याच्यासाठी करवा चौथचा उपास केला. मात्र संध्याकाळी तिने त्याच पतील अन्नातून विष देऊन त्याची हत्या केली. मॅक्रोनीमधून विष देऊन तिने त्याला खाऊ घातलं. ते खाताच त्याची तब्येत बिघडली, ते पाहून त्याची पत्नी तेथून लागलीच फरार झाली. कुटुंबियांनी त्या इसमाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, त्याची प्रकृती गंभीर होती. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश (य 32) असं मृताचं नाव असून तो इस्माइलपूर गावचा रहिवासी होता. त्याच्यात व पत्नीत नेहमी वाद व्हायचे, तिच्या चुकांमुळे तो नेहमी नाराज असायचा, सतत वाद व्हायचे अशी माहिती कुटुंबातील इतर सदस्यांनी दिली. रविवारी दुपारी, करवा चौथच्या दिवशीही त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यानंतरच त्याच्या पत्नीने, सविताने त्याला मॅक्रोनीमधून विष दिलं असा आरोप आहे. ती मॅक्रोनी खाताच शैलेशची तब्येत अचानक बिघडली. ते पाहून सविता पतील तसंच सोडून तिथून लागलीच फरार झाली.
या घटनेची माहिती मिळताच शैलेशचे कुटुंबीय तिथे आले आणि त्यांनी तातडीने त्याला इस्माइलपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथे उपचारांदरम्यानच शैलेशने अखेरचा श्वास घेतला. त्याचा लहान भाऊ अखिलेश याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पतीला मॅक्रोनी खाऊ घालून महिलेने घरातून पळ काढला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे असे सीओ अवधेश विश्वकर्मा यांनी सांगितले.