Pune Crime : पुण्यात चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक अत्याचार

| Updated on: Oct 04, 2024 | 10:26 AM

मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. पुण्यातील बोपदेव घाटात गँगरेप करण्यात आल्याची ही भयानक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime : पुण्यात चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक अत्याचार
पुण्यात महिलेवर सामूहिक अत्याचार
Follow us on

आधी बदलापूरमध्ये शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार… त्याचीच काही दिवसांपूर्वी पुण्यात पुनरावृत्ती… 45 वर्षांच्या स्कूल बस ड्रायव्हरने चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला. या घटनेमुळ निर्माण झालेला संताप अद्याप शमलेला नसतानाच आता पुण्यात सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. पुण्यातील बोपदेव घाटात गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही

बोपदेव घाटामध्ये सातत्याने लूटमारीच्या घटना घडत असतात. मात्र आता तेथे एका तरूणीवरती तिघांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला तिच्या मित्राने तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

मित्रासोबत फिरायला गेली होती तरूणी 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी 21 वर्षांची असून ती फिरायला मित्रासोबत बोपदेव घाटात गेली होती. मात्र तेवढ्यात तिथे तीन अनोळखी लोक आले आणि त्यांनी मित्राला मारहाण करून त्याला डांबून ठेवलं. त्यानंतर त्या तिघांनी पीडित तरूणीवर सामूहिक अत्याचार केला.

पीडित मुलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून पाच क्राईम टीम नेमण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक  टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.

 

सुप्रिया सुळे भडकल्या

दरम्यान या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे भडकल्या असून त्यांनी संतापून ट्विट केलं आहे. ‘ पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

 

स्कूल बसमध्ये ड्रायव्हरकडून दोन चिमुकलींवर निर्घृण अत्याचार

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. त्यावरून वातावरण तापलेले असतानाच काल पुण्यात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर ड्रायव्हरकडून अत्याचार करण्यात आला. वानवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

वानवडी पोलीस स्थानकात अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नराधम आरोपी सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यावर गेल्या चार दिवसांपासून बसध्ये अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

सदर आरोपी एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडतो. दोन्ही पीडित मुली या त्याच्या बसमधील पुढच्या सीटवर बसायच्या. गेल्या चार दिवसांपासून तो ड्रायव्हर दोन्ही मुलींशी अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचं नाही, अशी धमकीही त्या नराधमाने मुलींना दिली होती.