बुलडाणा : सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 20 वर्षीय महिलेने आत्महत्या (Women Suicide) केली. गळफास लावून या महिलेने स्वत:ला संपवलं. लग्नात हुंडा न दिल्यामुळे तसेच वेगवेगळे कारण दाखवून या महिलेचा सासरच्या मंडळींकडून शारिरीक आणि मानसिक छळ केला जायचा, असा आरोप केला जातोय. महिलेच्या (Women) मृत्यूनंतर जलंब पोलीस (Police) ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कठोरा येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील कठोरा येथे 20 जानेवारी रोजी धक्कादायक घटना समोर आली. येथे महिलेने गळफास घेत स्वत:ला संपवलं. तुला स्वयंपाकच येत नाही, जेवण जास्त करते, असे मृत महिलेला सतत हिणवले जायचे. तसेच हुंडा मिळाला नाही म्हणून शारीरिक, मानसिक छळ केला जायचा. हा त्रास असह्य झाल्याने 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी या विवाहितेने आपल्या नातेवाईकाला व्हिडीओ कॉल करून सर्व घटना ऐकवली आणि गळफासाचे फोटो काढून आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, सासरा, दीराला जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, मृत महिलेचे वडील देविदास राजुस्कर राहणार दसरानगर, शेगाव यांनी या प्रकरणात तक्रार दिली असून पोलिसांनी पती पवन सुभाष वाघ, सासरा सुभाष वाघ, सासू महानंदा वाघ, दीर गणेश यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलंय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
इतर बातम्या :