विवेक गावंडे, यवतमाळ : मुलाच्या व्यसनाला आणि रोजच्या त्रासाला कंटाळून आईनेच सुपारी देऊन आपल्या मुलाची हत्या केल्याची घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. नातेवाईकांनाच मुलाच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. योगेश विजय देशमुख असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. घटना उघडकीस येताच लोहारा पोलिसांनी आईसह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. वंदना देशमुख असे निर्दयी आईचे नाव आहे. ठरल्याप्रमाणे सुपारीचे पैसे न मिळाल्याने मारेकऱ्यांनीच पोलिसांनी मृतदेहाबाबत माहिती दिली. उषा चौधरी, मनोहर चौधरी, लखन चौधरी, विकी भगत आणि राहुल पठाडे अशी अन्य आरोपींची नावे आहेत.
योगेश हा दारुच्या आहारी गेला होता. यातून तो आई वंदना देशमुख हिला रोज त्रास द्यायचा. मुलाच्या या रोजच्या त्रासाला आई कंटाळली होती. अखेर तिने हा त्रास कायमचा मिटवायचा विचार केला. त्यानुसार तिने बहिण उषा चौधरी, भावोजी मनोहर चौधरी आणि भाचा लखन चौधरी यांच्यासोबत मिळून योगेशच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्यांनी विकी भगत आणि राहुल पठाडे यांना पाच लाख रुपयांची हत्येची सुपारी दिली. यासाठी दोन हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते.
ठरल्याप्रमाणे विकी भगत आणि राहुल पठाडे यांनी योगेशला यवतमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौसाळा जंगल परिसरात नेऊन योगेशची हत्या केली. त्यानंतर मृतदेह जंगलात फेकला. हत्या केल्यानंतर दहा-बारा दिवस उलटले तरी वंदना देशमुखने सुपारीचे पैसे न दिले नाही. यामुळे मारेकऱ्यांनी स्वतः पोलिसांना 112 नंबर वर कॉल करून जंगलात मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. त्यावरून लोहारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जलद गतीने तपास चक्र फिरवत मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. चौकशीत आरोपींनी आईने सुपारी दिल्याची कबुली दिली. यानंतर लोहारा पोलिसांनी दोन महिलेसह चौघांना गजाआड केले.