धक्कादायक… पोटच्या लेकीशी शारिरीक संबंध, नंतर नरबळी देण्याचाही प्रयत्न; नराधम बाप पोलिसांच्या जाळ्यात

| Updated on: Apr 26, 2022 | 6:20 PM

पोटच्या मुलीशी शारिरीक संबंध ठेवणाऱ्या नराधम बापाने गुप्तधनासाठी लेकीचा नरबळी देण्याचा पयत्न केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडलीय. यवतमाळच्या मादनी गावात हा संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय.

धक्कादायक... पोटच्या लेकीशी शारिरीक संबंध, नंतर नरबळी देण्याचाही प्रयत्न; नराधम बाप पोलिसांच्या जाळ्यात
पोटच्या लेकीचा नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या बापाला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

यवतमाळ : स्वत:च्या मुलीशी शारिरीक संबंध ठेवणाऱ्या नराधम बापाने गुप्तधनासाठी (Secret Money) लेकीचा नरबळी देण्याचा पयत्न केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये (Yavatmal) घडलीय. यवतमाळच्या मादनी गावात हा संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय. पीडित मुलगी ही 18 वर्षांची आहे. मुलीने सतर्कता दाखवत पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत नरबळीचा (Homicide) प्रकार टाळला. पोलिसांनी दोन महिला आणि मांत्रिकासह 11 आरोपींविरोधात बाभूळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

पीडित मुलीसोबत नेमकं काय घडलं?

पीडित मुलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, मी 13 वर्षाची असताना शाळेला सुट्ट्या लागल्या की यवतमाळमधून घरी येत होते. तेव्हा माझे वडील मला वाईट उद्देशानं कुठेही हात लावायचे. मी वडिलांच्या कृत्याबद्दल आईला सांगत होते. पण तेव्हा तुझे वडील तुझा लाड करत असतील असं आई मला सांगायची. मात्र, त्यांचे माझ्या अंगाला हात लावणे सुरुच होते. त्यानंतर मी एकदा सुट्टीवरुन घरी आल्यानंतर माझ्या वडिलांनी मी झोपेत असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मला त्रास होत असल्याने मी आईला सांगितलं. मात्र, तेव्हा तिला वाटलं की मासिक पाळी येत असेल म्हणून दुखत असेल, त्यामुळे तीने दुर्लक्ष केलं. माझे वडील आईला खूप मारहाण करतात त्यामुळे ती त्यांना घाबरते. पुढे मी जेव्हा जेव्हा घरी यायचे तेव्हा वडील माझ्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत होते. मी त्यांना विरोध केला असता तुला, तुझ्या आईला आणि बहिणीला मारुन टाकेन, अशी धमकी त्यांनी दिली, असं पीडित मुलीने पोलीस तक्रारीत म्हटलंय.

तरुणीच्या सतर्कतेमुळं जीव वाचला

इतकंच नाही तर 24 एप्रिल रोजी माझ्या वडिलांनी मला आणि बहिणीला बेदम मारहाण केली. मला बोलले की तुझ्यासारखी मुलगी जिवंत ठेवून काही उपयोग नाही. त्यानंतर 25 एप्रिल रोजी माझ्या वडिलांचं कुणाशी तरी फोनवर गुप्तधनाबाबत बोलणं सुरु होतं. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता वडिलांनी मला अंघोळ करुन तयार होण्यास सांगितले. त्यांनी आमची मागची खोली साफ केली. त्यानंतर रात्री 9 वाजता आमचा एक शेजारी, शेतात काम करणारा व्यक्ती आणि अजून 4 पुरुष आणि दोन महिला त्याठिकाणी आल्या. ते सर्वजण आणि माझे वडील आमच्या घराच्या मागच्या खोलीत गेले. तेव्हा मी, माझी आणि बहीण आम्ही बाजूच्या रुममध्ये थांबून होतो. तेव्हा माझ्या वडिलांनी दरवाजा लावायला सांगितला आणि तू बाहेर जायचं नाही, तुझं इथं काम आहे, असं मला सांगितलं. त्यानंतर त्यांची चर्चा सुरु असताना एकजण म्हणाला की गुप्तधनासाठी एकाचा बळी गरजेचा आहे. तेव्हा माझे वडील मी माझ्या मोठ्या मुलीचा बळी देण्यास तयार असल्याचं म्हणाले. तसंच ते वारंवार वाल्मिक बाबा अशा नावाने मांत्रिकाला हाका मारत होते. त्यांच्या बोलण्यातून ते सर्वजण राळेगावातून आल्याचं मला समजलं.

नरबळीचा प्रकार पोलिसांनी रोखला

माझ्या वडिलांनी आम्हा तिघींच्या हाती एक एक लिंबू दिला आणि पुन्हा त्या खोलीत परत गेले. तेव्हा मी लपून बघत होते. दोन महिलांच्या हाताने जागेची पूजा करुन बाकी जण एक मोठा खड्डा खोदू लागले. तेव्हा मला भीती वाटली. मी माझ्या मोबाईलमध्ये खड्ड्याचा फोटो काढला आणि यवतमाळच्या माझ्या मित्राला पाठवला. तसंच माझा बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव, असा मेसेज त्याला केला. हा मेसेज वडिलांनी वाचू नये म्हणून तो डिलीटही केला. त्यानंतर माझ्या वडिलांनी जबरदस्तीने मला त्या खोलीत नेले. तिथे सर्वांनी माझी पूजा केली. माझ्या गळ्यात हार घालण्यात आला. तेवढ्यात पोलिस दाखल झाल्यामुळे माझा जीव वाचला असं पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलंय.

इतर बातम्या :

Delhi Murder : दिल्लीत पाण्यावरुन झालेल्या भांडणातून महिलेची गळा चिरुन हत्या, पतीवरही वार

Ulhasnagar Murder : उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या, मुलाच्या आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून केलं कृत्य