विवेक गावंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, यवतमाळ | 20 डिसेंबर 2023 : कोणत्याही नात्यात विश्वास अतिशय महत्वाचा असतो. पती-पत्नीचं नातं तर संपूर्णपणे प्रेम आणि विश्वासावर चालतं. मात्र एकाचाही दुसऱ्यावरचा विश्वास कमी झाला तर सगळंच बिघडू शकतं. आणि या नात्यात एकदा संशयाचा किडा घुसला की मग संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. अशाच संशयाचा किडा डोक्यात वळवळवल्याने एका पतीने जे कृत्य केलं त्यामुळे त्याचा संसार तर विखुरलाच पण बाकीच्यांचही आयुष्य नासलं.
यवतमाळ जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत पत्नीसह जाऊन चौघांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. आरोपीने त्याची पत्नी, सासरा आणि त्याच्या दोन मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केली. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवारी रात्री ११ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने आजूबाजूच्या परिसरात अक्षरश: दहशतीचं वातावरण आहे. आरोपी जावई विरचंद पवार याला कळंब पोलीसांनी बेड्या ठोकत अटक केली.
भांडणाचा राग मनात धरला आणि ..
रेखा गोविंद पवार (पत्नी), पंडित भोसले (सासरा), ज्ञानेश्वर भोसळे (मेव्हणा) आणि सुनील भोसले (मेव्हणा) अशी मृत्यूमुखी पडलेल्याची नावे आहेत. तर या हल्ल्यात आरोपीची सासून रुखमा भोसले या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी (Police) नराधम जावई,गोविंदा वीरचंद पवार (रा. कळंब)याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आरोपीला गोविंदा याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच त्या दोघांचे भांडण झाले आणि आरोपीची पत्नी रेखा ही माहेरी निघून गेली. याचा आरोपीला प्रचंड राग आला आणि संतापाच्या भरात मंगळवारी रात्री उशीरा त्याने सासूरवाडी गाठली. तिरझडा गावात गेल्यानंतर आरोपीने बायको, सासू-सासरे आणि दोन मेहुण्यांची निर्घृणपणे हत्या केली.हत्येनंतर तो फरार झाला, पण अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.