राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवरील, महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत. बदलापूरच्या शाळेत तर दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, तर मुंबईत एका नराधम पित्याने त्याच्याच 9 वर्षांच्या मुलीचे शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे. मुलींच्या, महिलांच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर महिला, युवतींना स्वसंरक्षणाची जबाबादारी घेतली पाहिजे, असे सांगत जनजागृती करण्यात येत आहे. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली. मात्र तेव्हा त्या तरूणीने शांत बसून अन्याय सहन न करता त्या नराधामांना चांगलाच धडा शिकवला. आईची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना एका तरूणीने बेदम चोप दिला, खुर्चीनेही हाणल्याची घटना नाशिकच्या पवन नगर परिसरात घडली आहे. तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून लोक थक्क झाले. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
छेड काढणाऱ्या चौघांना माय लेकीने दिला चोप
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पवन नगर परिसरातील हेडगेवार चौकात हा प्रकार घडला. काही टवाळखोर रस्त्यावरील बाकांवर बसून महिलांची, मुलींची छेड काढत होते. एक तरूणी व तिची आई रस्त्याने जात अस्ताना त्यांनी तिचीही छेड काढली. सुरुवातीला महिलेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्या तरूणांना आणखीनच चेव चढला आणि त्यांनी पुन्हा छेडछाड सुरू केली. टवाळखोर नराधम आईची छेड काढत असल्याचे पाहून त्या मुलीचं डोकंच फिरलं. त्यांनी भर रस्त्यातच त्यांना चांगलाच चोप दिला.
जाब विचारला अन्…
महिलेने त्या टवाळखोराला आधी जाब विचारला, पण त्याने अरेरावी करत हुज्जत घालण्यास सुरवात केली. यानंतर महिलेचा पारा चढला आणि महिलेने रणरागिणीचे रूप धारण करून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. बाजूने एक भंगरवाल्याची गाडी जात होती, तिने त्या गाडीवरून एक खुर्ची उचलली आणि त्याचा प्रसाद देत अद्दल घडवली.
टवाळखोरांनी आईला छेडलं, मुलीने भर चौकात चोपलं… रणरागिणीचं सर्वत्र कौतुक ! pic.twitter.com/hFWizsxKGq
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2024
धाडसाचं होतंय कौतुक
त्या दोघींनी त्या तरूणांना बेदम चोप देत धडा शिकवला. हा संपूर्ण प्रकार त्या मार्गावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतोय. अन्याय सहन करता , छेड काढणाऱ्या अद्दल घडवणाऱ्या , त्या रणरागिणींच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. छेड काढणाऱ्या त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.