मुंबईत गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या असून शुल्लक घटनांवरून लोक गुन्ह्यांसाठी प्रवृत्त होताना दिसत आहेत. रस्त्यावरून जाताना एका कारचा बाईकला धक्का लागला, त्यावरून वाद झाला आणि तो मिटलाही. पण ते प्रकरण तिथेच मिटलं नाही. त्या वदानंतर दोन भावांनी त्याच चालकाच्या घरात घुसून त्याची निर्घृण हत्या केल्याचा भयानक प्रकार मुंबईच्या गोवंडीमध्ये घडला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत यामध्ये दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिल खान ( वय 35) असे मृत तरूणाचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी येथे राहत होता. शनिवारी रात्री आदिल हा त्याच्या कारने घराच्या दिशेना निघाला होता. मात्र त्यावेळी रस्त्याच्या लगत उभ्या असलेल्या एका दुचाकीला त्याच्या कारचा धक्का लागला. आणि ती दुचाकी तिथे असलेल्या एका महिलेच्या अंगावर पडली. त्यामुळे त्या महिलेला किरकोळ दुखापतही झाली. याच मुद्यावरून आदिल आणि त्या महिलेमध्ये वाद झाला, पण नंतर ते भांडणं तिथेच थांबलं.
मात्र हे प्रकरण तिथेच मिटलं नाही. त्या तरूणाशी वाद झाल्याची माहिती त्या महिलेने तिच्या दोन्ही मुलांना सांगितली आणि त्या दोघांनीही आदिल याच्याशी कडाडून भांडण करत वाद घातला. मात्र त्यानंतरही त्यांचा राग शांत झाला नाही. त्यानंतर रात्री त्या महिलेच्या दोन्ही मुलांनी आदिलचा पाठलाग केला आणि ते घरी पोहोचले. त्या दोघांनी आदिलवर हल्ला करत त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात आदिल गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात उपचारांपूर्वीच आदिलचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना अटक केली.