मुंबई : एकतर्फी प्रेम (One Sided Love) करीत असताना तरुणीने नकार दिल्यानंतर आत्महत्ये (Suicide)चा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीची पाच वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाली. 2017 मध्ये घडलेल्या या विशेष प्रकरणात मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने नुकताच निर्णय दिला आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत आरोपीला मागील पाच वर्षे तुरुंगात राहावे लागले. मात्र या प्रकरणात त्याच्यावरील आरोप सिद्ध करणारे पुरेसे ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केले. (Young man released after five years for attempting suicide due to his girlfriend’s refusal)
आत्महत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासाठी असलेल्या भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम 309 अंतर्गत असे नमूद केले आहे की, जो कोणी व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करेल किंवा असा गुन्हा घडवून आणण्यासाठी कोणतेही कृत्य करेल, त्या व्यक्तीला एक वर्षापर्यंतच्या मुदतीच्या साध्या कारावासाची शिक्षा होईल. या तरतुदीच्या अनुषंगाने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायदंडाधिकारी के.एच.ठोंबरे यांनी निकाल दिला.
न्यायदंडाधिकारी ठोंबरे म्हणाले की, आरोपीने स्वतःच्या पोटात चाकूने वार केला किंवा आत्महत्या करण्यासाठी विषारी द्रव्य प्राशन केले असे पुरावे रेकॉर्डवर नाहीत. प्रेमसंबंध तुटल्यामुळे आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला हे सिद्ध करण्यासाठी केवळ परिस्थिती पुरेशी नाही. आरोपीने स्वतःला इजा केली आणि स्वतःचे जीवन संपवण्यासाठी विषारी द्रव्य प्राशन केले हे फिर्यादीने सिद्ध केले पाहिजे होते. या प्रकरणातील फिर्यादी साक्षीदारांपैकी एकाही साक्षीदाराने आरोपीने स्वतःच्या पोटात चाकूने वार करताना किंवा विषारी द्रव्य प्राशन करताना पाहिल्याची साक्ष दिलेली नाही. एकंदरीत आरोपीविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यासाठी स्पष्ट पुरावे नाहीत. अशा पुराव्यांअभावी आरोपीला निर्दोष मुक्त केले जात आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
13 मे 2017 रोजी खार परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने तरुणीच्या घरासमोर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. तपासात असे समोर आले की, 2011 ते 2016 या कालावधीत त्या व्यक्तीचे कॉलेजमधील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. न्यायालयात त्या तरुणीने सांगितले की, आरोपी तिच्या घरी आला, त्याने दरवाजा वाजवला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने या घटनेबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. (Young man released after five years for attempting suicide due to his girlfriend’s refusal)
इतर बातम्या
Solapur Suicide : सोलापुरात माजी महिला ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या
Hit & Run : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; हिट अँड रन प्रकरणातील बळींच्या कुटुंबियांना आठपट अधिक भरपाई