कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या 54 वर्षीय वडिलांची डोक्यात पहार टाकून हत्या केली. त्यानंतर अपघात झाल्याचं भासवलं. पण पोलिसांनी केलेल्या तपासात हा अपघात नसून हत्येची घटना असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे आरोपी मुलाने आपल्या वडिलांच्या हत्येची कबुली दिली आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलाने इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया काही स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
संबंधित घटना ही कागल तालुक्यातील केनवडे येथे समोर आली होती. दत्तात्रय रामचंद्र पाटील असं 54 वर्षीय मृतक व्यक्तीचं नाव आहे. तर त्याच्या मुलाचं अमोल असं नाव आहे. अमोलनेच आपल्या वडिलांची हत्या केली. वडील सतत दारु प्यायचे. घरी दारु पिऊन आल्यानंतर अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ करायचे. तसेच मारहाणही करायचे. त्यामुळे आपण टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, असं आरोपी मुलाने कबुली जबाबाबत म्हटलं. पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
संबंधित घटना ही याच आठवड्यात सोमवारी (31 सप्टेंबर) रात्री घडली. आपले वडील केनवडे फाट्यावर गेल्याची माहिती अमोलला मिळाली. त्याने त्याआधीच वडिलांचा हत्येचा कट आखलेला होता. तो हातात पहार घेऊन केनवडे फाट्याच्या दिशेला निघाला. यावेळी वाटेत निढोरी रस्त्यावरील एका पुलावर त्याची वडिलांसोबत भेट झाली. यावेळी आरोपी तरुणाने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता आपल्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात पहार खुपसली. आरोपीचे वडील एका घावात खाली कोसळले.
वडिलांचा मृत्यू झाला की नाही याची आरोपीने आधी शाहनिशा केली. त्यानंतर त्याने वडिलांचा अपघात झाल्याचा बनाव रचला. एका अज्ञात वाहनाने वडिलांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं म्हणत तो रडू लागला. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी पंचनामा केला.
मृतकाच्या अंगावर अन्य कोणत्याही ठिकाणी दुखापत किंवा खरचटलं नव्हतं. त्यामुळे हा नेमका अपघात झाला तरी कसा? अशा विचारात पोलीस होते. मृतक तरुण हा थोडा भेदरलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. आरोपीच्या पुढच्या हालचाली आणखी संशयास्पद वाटू लागल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले.
पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली असता आपणच वडिलांची हत्या केली, अशी कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या हत्येचा उलगडा अवघ्या 48 तासात केला आहे. तसेच संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
पारनेरच्या एटीएम चोरीमधील म्होरक्या, बनावट नोटा छापण्यात मास्टरमाईंड, पोलिसांकडून 24 तासांत बेड्या