सांगली : मिरजमध्ये कौटुंबिक वादातून मुलाने वडिलाच्या डोक्यात पार घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज कुपवाड रोड होमगार्ड प्रशिक्षक केंद्र जवळ ही घटना घडली आहे. किसन जोतिराम माने (वय 50) हे घरी एकटे असताना मुलगा विजय याने त्यांच्या डोक्यात पार घालून हत्या केली. त्यानंतर तो पळून गेला. संबंधित घटना घडली त्यावेळी किसन यांची पत्नी शेळ्यांना फिरविण्यासाठी गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर त्यांना दरवाज्यासमोर पडलेला पतीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी त्यांनी मुलगा हा पळून जाताना दिसल्याचे सांगितले.
संबंधित घटनेची माहिती मिळताच मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्याचे रविराज फडणीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. खुनातील पार हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपी विजय माने हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. घरात मयत किसन माने, त्यांची पत्नी, मुलगा विजय हे तिघेच राहत होते.
खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पण कौटुंबिक वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर विजय माने यांचा शोध घेण्यासाठी शोध पथके रवाना केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली आहे.
दुसरीकडे केरळमध्ये एका इसमाने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीला सर्पदंश करुन तिची हत्या केल्याप्रकरणी केरळातील पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हुंड्यासाठी 25 वर्षीय पत्नी उत्तराचा छळ करुन हत्या केल्याप्रकरणी सुरज दोषी आढळला होता. कोल्लमच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत शिक्षेची सुनावणी केली. बचाव पक्षाने सुरजला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र सुरजला जन्मठेपेची शिक्षा सुरु करण्यापूर्वी दोन आरोपांखाली सलग 10 वर्षे आणि 7 वर्षे शिक्षा भोगावी लागेल. त्याला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
पत्नी उत्तरा कोल्लमपासून 40 किमी अंतरावर तिच्या मामाच्या घरात राहत होती. झोपेत असताना त्याला नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना 7 मे 2020 रोजी घडली होती. त्यावेळी सुरज-उत्तराच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती आणि त्यांना एक वर्षाचे मूलही आहे.
फिर्यादींनी उत्तराचा पती सुरज एस कुमारवर आरोप केला आहे की त्याने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन नागाने चावा घेतल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की गेल्या वर्षी 2 मार्च रोजीही सुरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.
हेही वाचा :
वर्चस्वाच्या वादातून यवतमाळमध्ये मोठा घातपात, दोघांची हत्या, सहा आरोपींना बेड्या