वधू-वरांनी वरमाला घालताच उत्साहात तरुण फायरिंग करायला गेला, मग जे घडले ते भयंकर

| Updated on: May 18, 2023 | 11:14 PM

लग्नसोहळा आनंदात पार पडत होता. वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातल्या. यानंतर एक हौशी तरुण हवेत फायरिंग करत होता. मात्र त्याची हौस दुसऱ्या तरुणाला भारी पडली.

वधू-वरांनी वरमाला घालताच उत्साहात तरुण फायरिंग करायला गेला, मग जे घडले ते भयंकर
लग्नसमारंभात झालेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू
Image Credit source: Google
Follow us on

समस्तीपूर : सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु आहे. सोशल मिडियाच्या जमान्यात लग्नाच्या सेलिब्रेशनचा माहोल पूर्णपणे बदलून गेला आहे. याच उत्साहाचा भाग म्हणून लोक लग्नात फायरिंग करु लागले असून, हे फॅड जिवावर बेतत आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन कठोर पावले उचलत आहे. मात्र त्यानंतरही फायरिंग सुरु असल्याने बिहारमध्ये लग्नात एका तरुणाचा बळी गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या लग्नात सहभागी झालेल्या तरुणाला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे लग्नमंडपात शोककळा पसरली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेईना

बिहारमध्ये पोलिसांच्या कडक कारवाईनंतरही गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळेच आणखी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना बुधवारी रात्री समस्तीपूर जिल्ह्यातील दलसिंगसराय उपविभागाच्या अंगार घाट पोलीस ठाण्यांतर्गत चेता उत्तर पंचायतमध्ये घडली. गोळीबारात बिशनपूर बथुआ गावातील रामशंकर सिंग यांचा मुलगा अमन कुमार याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मयत तरुण मित्राच्या भावाच्या लग्नाला आला होता

अमन हा मित्राच्या भावाच्या लग्नाला गेला होता. लग्न झाल्यानंतर वरातीमध्ये सहभागी झाला होता. याचदरम्यान आनंदाच्या भरात एक तरुण गोळीबार करत होता. त्या तरुणाने दोन राऊंड फायर केले तर तिसरी गोळी पिस्तुलातच अडकल्याचे सांगण्यात येत आहे. गोळी झाडत असताना अचानक आग लागली आणि एक गोळी अमनच्या डोक्यात लागली. त्यात अमन खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर लग्नाच्या वरातीमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वरातीतील लोकांचा राग अनावर झाला आणि मंडपात ठेवलेल्या जवळपास सर्वच खुर्च्या तोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

तरुणाची हत्या घडवून आणल्याचा तरुणाच्या नातेवाईकांचा आरोप

गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर वराच्या घरच्यांनी घाईघाईत लग्नाचा सोहळा उरकला. दरम्यान, मृत तरुणाच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याचा आरोप तरुणाचे नातेवाईक करीत आहेत. आठवडाभरापूर्वी दलसिंगसराय उपविभागातील दलसिंगसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नसमारंभात गोळीबार झाला होता. त्या घटनेत 11 वर्षीय मुलाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता, तर दुसरा मुलगा जखमी झाला होता.