रेशनिंग बंद, आर्थिक प्रगती खुंटली… करणी केल्याच्या रागातून तरूणाने वृद्धाला संपवलं !

| Updated on: Sep 26, 2024 | 11:23 AM

पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातवे गावतील एका व्यक्तीचा खून झाल्याने एकच खळबळ माजली. गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावरील पुलाजवळ त्या इसमाची मोटारसायकल सुरक्षा कठड्याला लटकताना दिसली. तर त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.

रेशनिंग बंद, आर्थिक प्रगती खुंटली... करणी केल्याच्या रागातून तरूणाने वृद्धाला संपवलं !
करणी केल्याच्या रागातून तरूणाने वडीलधाऱ्या व्यक्तीची केली हत्या
Image Credit source: tv9
Follow us on

पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातवे गावतील एका व्यक्तीचा खून झाल्याने एकच खळबळ माजली. गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावरील पुलाजवळ त्या इसमाची मोटारसायकल सुरक्षा कठड्याला लटकताना दिसली. तर त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

अखेर कसून तपास केल्यानंतर याप्रकरणी एका 30 वर्षांच्या इसमाला अटक करण्यात आली. मृत इसमाने आपल्यावर करणी केली, त्यामुळे रेशनिंग मिळण्याचे बंद झाले आणि आर्थिक प्रगती खुंटली, या गैरसमजातून, रागातून पण त्या इसमाची हत्या केल्याचे आरोपीने कबूल केले. गणपत गेनबा खुटवड असे मृत इसमाचे नाव तर स्वप्निल जानोबा खुटवड असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नक्की काय घडलं ?

गणपत गेनबा खुटवड हे रोजच्या प्रमाणे रविवार २२ सप्टेंबरच्या रात्री नसरापूर येथून आपल्या घरी यायला निघाले. रात्रीची वेळ होती. पुढे जाऊन आपल्या बरोबर एक भयानक प्रसंग घडणार असून आपल्यासाठी ही काळ रात्र ठरणार आहे, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. गणपत खुटवड हे दुचाकीवरून हातवे बु. येथील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावरील पुलाजवळ पोहोचले आणि तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्याठिकाणी नक्की काय घडले ? कशामुळे घडले ? याबाबत कोणालाही कसलीच माहिती नव्हती.

यादरम्यान त्याच रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे पुतणे संदीप खुटवड यांना फोन आला की, मयत गणपत खुटवड यांची मोटारसायकल ही हातवे बु. येथील बंधाऱ्याच्या सुरक्षा कठड्याला लटकताना दिसत आहे. त्यानंतर संदीप खुटवड यांनी नातेवाईक व गावातील काही ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना गणपत खुटवड यांचा मृतदेह बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस नदी पात्रात आढळून आला. गणपत यांच्या डोक्यास मार लागून त्यामधून रक्त येत असल्याचे दिसले.

नातेवाईकांना घातपाताचा संशय

तेव्हा नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घेतला असता गणपत यांचा मोबाईल व चष्मा रोडच्या पश्चिम बाजूस नदीपात्राच्या उतारावर एकाच जागी सापडला. त्यापासुन काही अंतरावर विष्ठा केल्याचे दिसून येत होते. तसेच त्यांच्या पायातील एक चप्पल ही त्याच ठिकाणापासून पाण्याजवळ सापडली. या घटनेची राजगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. परंतु घटनास्थळी आढळणाऱ्या सर्व वस्तू संशयास्पद दिसत होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला.

गावातील तरूणाशीच झाला होता वाद

या घटनेची राजगड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. पोलिसांनी मयत गणपत खुटवड यांच्या दिनक्रमाची गावपातळीवर माहिती घेतली असता त्यांचे गावातीलच स्वप्निल जानोबा खुटवड (वय 30) या तरुणासोबत वादविवाद असल्याचे समोर आले. रविवारच्या रात्री मयत गणपत खुटवड हे आपल्या गावातून नसरापूर येथे गेले होते. त्यांच्या मागे स्वप्निल खुटवड हा देखील नसरापूर येथे गेला होता. त्यांनतर साडेदहाच्या सुमारास मयत गणपत खुटवड हे नसरापूर येथून पुन्हा गावाकडे येण्यास निघाले असताना स्वप्निल खुटवड हा देखील त्यांचा पाठलाग करत गेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

अखेर स्वप्निलला घेतलं ताब्यात

त्यानंतर पोलिसांनी स्वप्निल खुटवड याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय अधिकच वाढला. यानंतर पोलिसांनी त्याला शोधण्यास सुरुवात केली. अखेर गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वप्निल याला कटवड्याला खेडशिवापूर येथून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान स्वप्निलने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनतर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सर्व घटनाक्रम सांगण्यास सुरुवात केली, आणि पुढे जे सत्य समोर आले. ते मन सुन्न करणारे होते. त्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

करणी केल्याच्या रागातून केली हत्या

यावेळी स्वप्निल खुटवड म्हणाला की, “मयत गणपत खुटवड हे काळुबाई देवीचे देवऋषी असून त्यांचे रेशनिंगचे दुकान आहे. त्यांनी मला करणी केली आहे. त्यामुळे माझे रेशनिंग मिळण्याचे बंद झाले असून माझी आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबाबत राग होता. त्यामुळे मी त्यांचा पाठलाग करून गुंजवणी नदीच्या पुलाजवळ त्यांना अडवून डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला व त्यांचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला. आणि हा अपघात वाटावा म्हणून त्यांची मोटार सायकल पुलावर सुरक्षा कठड्यालगत अडकवून ठेवली.” असे सांगून स्वप्निलने शेवटी गैरसमजातून खून केल्याचे कबूल केले. स्वप्निल उर्फ बंटी खुटवड यास बुधवारी भोर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.