पुणे : राज्यातील शिक्षकांच्या मानगुटीवरुन टीईटी घोटाळ्याचे (TET Scam) भूत काही केल्या उतरताना दिसत नाही. टीईटी घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडून दिली होती. अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे (Bogus Certificate)सादर करत ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि नोकरी मिळवली असा दावा करण्यात आला होता. राज्य परीक्षा विभागाने (State Examination Department) तब्बल ८ हजार उमेदवारांची यादीच जाहीर केली होती. त्यानंतर आता टीईटी घोटाळ्यात पुणे जिल्ह्यातील 170 शिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर 8 हजार विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता यामधील पुण्यात कार्यरत काही शिक्षण सेवकांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. 170 शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलिसांनी 2021 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्याचे खोदकाम 2019 आणि 2018 पर्यंत करण्यात आले. यातील घोटाळ्याने शिक्षण क्षेत्र हादरले. अनेक मोठ्या लोकांची नावे या घोटाळ्यात असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील 170 शिक्षकांची नावे राज्य परीक्षा परिषेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारपासून या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कागदपत्रांआधारे सलग तीन दिवस ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये संबंधित शिक्षकाला देण्यात आलेले नियुक्ती आदेश, टीईटी उत्तीर्ण मूळ प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार . पहिल्या दिवशी 60 तर दुसऱ्या दिवशी तितक्याच आणि शेवटच्या दिवशी उर्वरीत शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल.