नागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील (Amravati University) विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विज्ञान व आंतर विद्याशाखीय अभ्यास या 4 विद्या शाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत (Choice Based Credit System) लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या विद्या परिषदेच्या सभेत याविषयी शिक्कामोर्तब झाले. राज्यात ही पद्धत अभ्यासक्रमामध्ये (Syllabus)लागू करणारे अमरावती विद्यापीठ प्रथम ठरले आहे,शिक्षण, अध्यापन, परीक्षा व मूल्यांकन याबाबत हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आवश्यक असलेले निदेश, अध्यादेश व विनियम यांना सुध्दा विद्या परिषदेने मान्यता प्रदान केली आहे.
विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक विभागांना सत्र 2022-2023 पासून लागू होणार आहे. सीबीसीएस अभ्यासक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, त्याबाबत काही अडचणी असल्यास त्याचे निवारण होण्यासाठी आढावा समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश असणार असून त्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे अशी माहिती विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम 50 ते 60 टक्के असणारच आहे पण त्याच विद्यार्थ्याला जर इतर कुठल्याही विषयांमध्ये रस असेल मग तो विषय खेळाचा असू शकतो किंवा रोजगाराचा, स्किल ओरिएंटेड असू शकतो विद्यार्थी कोणत्याही विषयाची निवड करू शकतात असं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु दिलीप मालखेडे म्हणाले.