देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच अभ्यासक्रमाची चर्चा सुरू आहे. त्यातच ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, या महत्वाकांक्षी योजनेचा श्रीगणेशा झाला आहे. आधार कार्डप्रमाणेच Apaar Card हे देशातील विद्यार्थ्याची नवीन ओळख असेल. हा 12 अंकाचा युनिक क्रमांक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य बदलून टाकेल. इतकंच कशाला मुलांच्या करिअरसाठी, नोकरीसाठी हा क्रमांक उपयोगी ठरणार आहे. सरकारकडे आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इंत्यभूत डाटा असेल. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती असेल. त्यांच्या इतर कौशल्य, खेळातील प्राविण्य याची संपूर्ण माहिती असेल. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांचा सीव्ही (Curriculum Vitae) असेल.
30 कोटींहून अधिक अपार कार्ड
Apaar Card हे विद्यार्थ्यांचे Aadhaar Card आहे. देशात आतापर्यंत 30 कोटींहून अधिक अपार कार्ड तयार करण्यात आले आहे. 15 हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या अपार कार्ड नोंदणी झाली आहे. 35 लाखांहून अधिक शैक्षणिक दस्तावेजांची अपारवर नोंद झाली आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे. हे कार्ड कुठे आणि कसे तयार होणार आहे, त्याचा फायदा काय या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…
महाराष्ट्रातही अपार कार्डचा श्रीगणेशा
केंद्र सरकार नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरण घेऊन आले आहे. या नवीन धोरणानुसार हे कार्ड तयार करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने अपार आयडी कार्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचे हे ओळखपत्र आहे. ‘ एक राष्ट्र, एक विद्यार्थी कार्ड’ या संकल्पनेवर ते आधारीत आहे. महाराष्ट्रातही अपार कार्डचा श्रीगणेशा झाला आहे.
‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री’ (Automated Permanent Academic Account Registry) असे अपार कार्डचे सविस्तर नाव आहे. हे कार्ड 12 आकड्यांचे आहे. इयत्ता 12 वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती या कार्डमध्ये जतन करण्यात येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणच नाही तर नोकरी मिळेपर्यंत या कार्डचा उपयोग होईल. विद्यार्थ्याने शाळा बदलली तरी अपार आयडी कार्ड एकच असेल. ते बदलणार नाही. अपार कार्ड हे आधार कार्डपेक्षा वेगळे असेल. आधार आणि अपार कार्ड हे संलग्न असतील. हे दोन्ही कार्ड लिंक असतील. या कार्डमधील माहिती अपडेट होत राहील. डिजीलॉकरमध्ये विद्यार्थ्यांची माहिती जतन असेल. हे विद्यार्थ्यांचे एडूलॉकर असेल.
कोणत्या कामासाठी ठरेल उपयोगी?
‘अपार कार्ड’ मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येईल. हे कार्ड म्हणजे त्यांचे शिक्षण माहितीपत्रच असेल. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसं मिळाली, प्रमाणपत्र मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याचा आलेखच हे कार्ड असेल. त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देण्यात येईल. त्यांच्या गुणवत्तेचा आलेख असेल. शाळा बदलली तर ती पण माहिती जतन होईल.
‘अपार कार्ड’ मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येणार आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्याची सर्व शैक्षणिक, क्रीडा आणि शिष्यवृत्तीबाबतची माहिती जतन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसं मिळाली, प्रमाणपत्र मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याची माहिती यामध्ये असेल. विद्यार्थ्याची शाळा बदलली तरी हा रेकॉर्ड कायम असेल. तो प्रत्येक शाळेत अपडेट करण्यात येईल.
कसे तयार होणार ‘अपार कार्ड’ ?
‘अपार कार्ड’ तयार करण्यासाठी विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ‘डिजिलॉकर’ वर त्याचे खाते असणे आवश्यक आहे. त्याआधारे विद्यार्थ्याची केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. ‘अपार कार्ड’ संबंधित शाळा, महाविद्यालये नोंदणी करुन देतील. त्यासाठी आई-वडिलांची सहमती घेण्यात येईल.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया
अपार कार्ड तयार करण्यासाठी चिंता करण्याची गरज नाही. हे कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी कुठेही धक्के खाण्याची, लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. शाळेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे पालकांना शाळेच्या मदतीने त्यात पुढील माहिती अपडेट करता येईल. डिजीलॉकर लॉगिन करणे हा पण या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.
Academic Bank of Credit वर त्याची नोंदणी करण्यात येणार आहे.
ABC च्या साईटवर गेल्यावर My Account वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर विद्यार्थी हा पर्याय निवडा. या ठिकाणी साईन-अप करा.
त्यासाठी आधार कार्ड क्रमांक संख्या, मोबाईल क्रमांकाची नोंद करा.
त्यानंतर डिजीलॉकर खाते उघडेल. डिजीलॉकर लॉगिन करा.
Apaar ID तयार करण्यासाठी udiseplus.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. ज्या पालकांनी आधार कार्ड व्हेरिफिकेशन केलेले नाही. त्यांना या संकेतस्थळावर पुढील प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा व्यवस्थापनाला एक Consent Form भरून घ्यावा लागणार आहे. त्यात आई, वडील, दोघंही अथवा कायदेशीर पालकांची संमती घेणे आवश्यक आहे. शाळेला त्यासाठी पालकांची बैठक आयोजित करावी लागेल. अथवा त्यांना यासंबंधीची माहिती सांगावी लागेल. विद्यार्थांचा अचूक आधार कार्ड क्रमांक, पूर्ण नाव, पत्ता याची माहिती भरावी लागेल. ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली असल्याने विद्यार्थ्याशी संबंधित माहिती बिनचूक असावी असा आग्रह आहे.
त्यानंतर udiseplus.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑल मॉडल हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर स्टूडंट मॉडेलवर जाऊन पुढील प्रक्रिया होईल. राज्याची निवड करुन आयडी पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यात सध्याचं शैक्षणिक सत्राचे वर्ष निवडावे लागेल. शाळेसंबंधीची पूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याची माहिती भरता येईल. त्यात त्याची इयत्ता, नाव, आधार कार्ड ही माहित अचूक आहे का हे तपासावे लागेल. त्यानंतर अपार आयडी कार्ड जनरेट करता येईल. एक महत्त्वाचे काम म्हणजे आधार कार्डचा पडताळा, व्हेरिफिकेशन करणे हे अनिवार्य आहे. ज्या पालकांना आधारकार्डवरील मुलांच्या नावात, जन्म तारखेत बदल करायचा आहे. त्यांनी तो अगोदरच करून घेतल्यास माहिती चुकणार नाही. नवीन आधार कार्डनुसार विद्यार्थ्याची माहिती अचूक भरता येईल. ज्या पालकांना आधार कार्डवरील माहितीत बदल करायचा आहे, त्यांनी अपार कार्ड तयार करण्यापूर्वी त्याविषयीची माहिती शाळेला द्यावी. पालकांचे आधार कार्ड, वाहन परवाना वा पुरावा म्हणून सादर करता येईल असे कागदपत्रं द्यावे लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुख्याध्यापक, हेडमास्तर अथवा संबंधित वरिष्ठांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे अपार कार्ड तयार करण्यासाठी मंजूरी घ्यावी लागेल. सर्व सोपस्कार झाल्यानंतर Apaar Card तयार होईल.
असे असेल अपार कार्ड
देशभरातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अपार कार्ड तयार होईल
विद्यार्थ्यांना 12 अंकांचे अपार कार्ड देण्यात येणार आहे
त्यात विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, त्याचा आधार कार्ड यांची नोंद होणार
या अपार कार्डवर, 12 अंकी कार्ड क्रमांक, क्यूआर कोड असेल
या कार्डवर विद्यार्थ्यांचा फोटो असेल
1. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्या शाळेत दाखला घेताना, देशातील कोणत्याही महाविद्यालयात, पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपार कार्डचा डेटा वापरता येईल. अपार आयडी, अपार 12 अंकांच्या आधारे त्याचा प्रवेश निश्चित होईल. कागदपत्रांची झंझट संपेल.
2.विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरणा, उत्तीर्ण परीक्षा आणि त्याचा रेकॉर्ड ट्रॅक होईल. विद्यार्थ्यांचा त्यांच्या 12 अंकी क्रमांका आधारे शैक्षणिक सत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येईल.
3.अपार कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळेल. सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते. त्यासाठी हे कार्ड ग्राह्य असेल.
4.अपार कार्डमुळे विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालयात मोफत प्रवेश असेल
5.सरकारकडे एकदा डाटा आल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मोफत पुस्तकं आणि वह्यांचा पुरवठा होईल. त्यांना स्टेशनरी पुरवण्यात येईल.
6.विद्यार्थी, पालक यांचे आधार कार्ड आणि त्याला पॅन कार्ड जोडणी झाल्यानंतर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देणे सोपे होईल
7.यापुढे विद्यार्थ्यांचे बँकेतील खाते उघडताना आधार कार्ड आणि अपार आयडी महत्त्वाचा असेल. त्यामुळे गरजू आणि पात्र विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली हे निश्चित होईल.
8.विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड आणि अपार कार्ड संलग्न असेल. विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ या खात्यात जमा होईल. त्यांच्या पुरस्काराची रक्कम, विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यात जमा होणार आहे.
10.देशभरात शैक्षणिक सहली आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या या माहितीचा उपयोग होईल. विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलतीत प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा वापर होईल.
11.विद्यार्थ्यांची संख्या, विविध अभ्यासक्रमातील जागा, व्यावसायिक अभ्यासक्रमातील जागा या सर्वांची गोळाबेरीज करणे आणि नोकरीची, रोजगाराची उपलब्धता यांची सांगड घालता येईल. त्याआधारे नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
12.तामिळनाडू सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगचे (NIOS) धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकार सुद्धा याच धरतीवर विद्यार्थ्यांना अपार कार्डच्या माध्यमातून कौशल्य विकसीत करणारे अभ्यासक्रम सुचवेल. रिमोट शिक्षण प्रणालीद्वारे 18 विषयात विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळवता येईल.
13.सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळतीचे प्रमाण, त्यामागील कारण, शिक्षकांची संख्या आणि जिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून बोगस गिरी सुरू आहे, ते सर्व प्रकार या नवीन अपार कार्डमुळे समोर येतील. पट संख्या नसताना शिक्षकांची नियुक्ती, अतिरिक्त शिक्षक, शिक्षकांची गरज या सर्वांची गोळाबेरीज समोर येईल.