शाळा सुरू झाली पण काही तासांतच बंद केली; हिरमोड झालेले विद्यार्थी उद्या धरणात करणार निदर्शने…

| Updated on: Oct 13, 2022 | 8:39 PM

जिल्हा परिषदेच्या शालेय विभागाच्या निर्णयाच्या विद्यार्थ्यांनी आता शाळाच नको म्हणून भाम धरणात दप्तरे विसर्जित करून निषेध नोंदवणार आहे.

शाळा सुरू झाली पण काही तासांतच बंद केली; हिरमोड झालेले विद्यार्थी उद्या धरणात करणार निदर्शने...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

शैलेश पुरोहित, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Nashik Igatpuri) तालुक्यातील दरेवाडी येथील शाळा बंद करण्यात आली होती. पटसंखेच्या नव्या धोरणानुसार पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेली शाळा (School) जिल्हा परिषदेच्या (ZP) शालेय विभागाने बंद केली होती. संतप्त विद्यार्थ्यांनी निवेदन देत शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, निवेदन देऊनही शाळा सुरू न केल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. बकऱ्या द्या, दप्तर घ्या या आशयाखाली घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी शाळा सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. यानंतर नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या विभागाने दखल घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. जिल्हा परिषदेने शाळा बंद करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या शालेय विभागाच्या याच निर्णयाच्या विद्यार्थ्यांनी आता शाळाच नको म्हणून भाम धरणात दप्तरे विसर्जित करून निषेध नोंदवणार आहे.

कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा हक्क असतांना शाळा बंद झाल्याने दरेवाडी येथील ग्रामस्थ, शिक्षक, आणि विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहे.

हे सुद्धा वाचा

संतप्त विद्यार्थ्यांनी आज या शाळेला रामराम ठोकला असून भाम धरणात 43 विद्यार्थ्यांचे दप्तर, वह्या, गणवेश, शैक्षणिक साहित्य जवळच असणाऱ्या भाम धरणात विसर्जन करणार आहे.

या विसर्जन कार्यक्रमाला तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी शक्य झाले तर हजर राहावे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा शेवट पाहण्यासाठी साक्षीदार व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

यानंतर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी धडक देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकूणच पत्रांचा खेळ खेळत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत असून इतर पर्याय नको आहे तिथेच शाळा सुरू करा अशी मागणीवर ग्रामस्थ ठाम आहे.

त्यामुळे ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी धडक देण्याआधी जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त सीईओ आशिमा मित्तल यातून काही मार्ग काढतात का ? याकडे ग्रामस्थांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.