शाळेच्या पुस्तकालाच वही जोडली तर? सरकारने मागवली मतं, बालभारतीच्या शंका काय?

| Updated on: Oct 29, 2022 | 1:44 PM

गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणं अनेकदा परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडथळे येतात. यासाठीच शासन स्तरावर नवी योजना आणण्यावर विचार सुरु आहे.

शाळेच्या पुस्तकालाच वही जोडली तर? सरकारने मागवली मतं, बालभारतीच्या शंका काय?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः शालेय विद्यार्थ्यांचं दप्तरातलं (School Bag) ओझं कमी करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे (Maharashtra Education) महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय पाठ्यपुस्तकांनाच वह्यांची पानं जोडण्यावर सरकारचा विचार सुरु आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी यासंदर्भातील विचार मांडा होता. आता हा विचार प्रत्यक्षात किती व्यवहार्य आहे, यावरून बालभारतीच्या वतीने एक सर्व्हे सुरु केला आहे.

पुस्तकांमध्ये वह्यांची पानं लावली तर तर ती किती असावीत, कोणत्या इयत्तेसाठी किती असावीत, कोणत्या विषयात किती असावीत, विद्यार्थ्यांना या पानांचा खरच उपयोग होईल का? अभ्यास करताना विद्यार्थी यात नोंदी करतील का, यामुळे वह्यांचा वापर थांबेल का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न बालभारतीच्या वतीने विचारण्यात आले आहेत.

https://academics.balbharati.in/notebook या लिंकवर बालभारतीच्या वतीने एक प्रश्नावली अपलोड केली आहे. त्यात सदर योजनेसंदर्भातील काही प्रश्नांची मांडणी करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रीतील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींनी यांची उत्तरं देण्याचं आवाहन करण्यात आलंय.

गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणं अनेकदा परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडथळे येतात. यासाठीच शासन स्तरावर नवी योजना आणण्यावर विचार सुरु आहे. आपल्या कामातून पाच मिनिटे वेळ काढून या प्रश्नावलीची उत्तरे भरून द्यावी, असे आवाहन बालभारतीतर्फे करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या शिक्षकांना ही प्रश्नावली भरून देण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन बालभारतीने केले आहे. हा निर्णय शिक्षण पद्धतीवर दूरगामी परिणाम करू शकतो, असे सांगण्यात आले आहे.