मुंबई : राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे (School started) वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्या आहेत. मात्र, अजूनही कोरोना आणि आॅमिक्रोनचे संकट आहेच. तसेच सरकारने शाळा सुरू करण्याच्या अगोदर नियमावली देखील जारी केली होती. मात्र, असे असताना देखील नवी मुंबई येथून धक्कादायक माहीती पुढे येते आहे.
घणसोलीतील शेतकरी विद्यालयातील प्रकार
घणसोलीतील शेतकरी विद्यालयातील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मागील 3 दिवसात 800 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कतारवरून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. हा मुलगा घरात न थांबता शाळेत गेल्याने इतर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
आता सर्व विद्यार्थ्यांना वाशी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वांची तब्बेत उत्तम असल्याचे देखील सांगितले जात आहे. आज पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या 3 टीम कोरोना चाचणी करण्यासाठी शाळेत दाखल झाल्या होत्या. मात्र घाबरून विद्यार्थी शाळेत आले नाहीत. जे विद्यार्थी शाळेत आले नाहीत. त्याची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहीती आहे. शाळासंदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली होती. मात्र, तरीही एकाच शाळेतील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
राज्य सरकारची नियमावली
-विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये घ्यावी
-एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे या गोष्टींचे पालन करावे.
-विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
-शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.
संबंधित बातम्या :