नागपूर : महाज्योतीच्या (Mahajyoti) यूपीएससी चाचणी परीक्षेची (UPSC) मुदत वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच जेईई (JEE) आणि नीट चाचणी (NEET) परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाज्योतीच्या जेईई आणि नीट चाचणी परीक्षेला 31 ॲाक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाज्योतीची चाचणी परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाज्योतीची चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबत महाराष्ट्रासह दिल्लीतही महाज्योतीच्या चाचणी परीक्षेचं सेंटर आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. महाज्योतीच्या मार्फत राज्यात 72 होस्टेल सुरु करण्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच, महाज्योती मार्फत यूपीएससी आणि एमपीएससी ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाते. महाज्योतीने इच्छुक उमेदवारांकडून नि:शुल्क प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागवले होते. यासाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज केले. उमेदवारांची निवड करण्यासाठी येत्या 13 सप्टेंबर रोजी छाननी परीक्षा नियोजित होती. पण वेळ कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागणार होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार महाज्योतीच्या चाचणी परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’तर्फे (महाज्योती) राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पीएचडीपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता महाज्योतीच्या (Mahajyoti) वतीने ओबीसी (OBC), भटक्या जाती-जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे.
ओबीसी आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘महाज्योती’ला निधी मिळाला आणि पूर्ण वेळ एमडीही मिळाले आहेत, अशी माहिती काही दिवसापूर्वीच वडेट्टीवार यांनी दिली होती. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. नुकतंच अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाज्योती’ला 150 कोटी रु. मंजुर केलेय. त्यापैकी 15 कोटी रुपये रुपये महाज्योतीच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आलेय. शिवाय महाज्योतीला आता पूर्ण वेळ एमडी मिळालेय. त्यामुळे महाज्योतीच्या कामाला आता गती येणार आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार म्हणाले.
संबंधित बातम्या