नवी दिल्ली : हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन असलेल्या भारतीय वंशाच्या श्रीकांत दातार (Srikant Datar) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारत सरकारकडून दातार यांना ‘पद्मश्री’ जाहीर करण्यात आला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. (Harvard Business School Dean Srikant Datar receives Padmashree)
मराठमोळे श्रीकांत दातार महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. श्रीकांत दातार हे गेल्या 25 वर्षांपासून हार्वर्ड विद्यापीठात सेवा बजावत आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदावर विराजमान होणारे ते सलग दुसरे भारतीय वंशाचे प्राध्यापक ठरले आहेत.
श्रीकांत दातार हे हार्वर्ड विद्यापीठाच्या 112 वर्षांच्या इतिहासातले 11 वे डीन आहेत. याआधी, नितीन नोहारिया यांनी दशकभरापासून डीनपदी सेवा दिली होती. डिसेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त झाल्यानंतर दातार यांनी पदभार स्वीकारला.
उच्च विद्याविभूषित श्रीकांत दातार
श्रीकांत दातार यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून डिस्टिंक्शनसह बीएचे शिक्षण पूर्ण केले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) मिळवलेली आहे. तसेच दातार यांनी सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी बिझनेसमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.
श्रीकांत दातार यांचा कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये हातखंडा
श्रीकांत दातार हे मागील 25 वर्षांपासून हार्वर्ड विद्यापीठात सेवा देत आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. कॉस्ट मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स या क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इनोव्हेटिव्ह प्रॉब्लेम स्वॉल्व्हिंग आणि मशीन लर्निंग या विद्याशाखेत ते निपुण आहेत. श्रीकांत दातार हे नोवार्टिस एजी आणि टी-मोबाईल यूएस इंकसोबतच कित्येक कंपन्यांच्या बोर्डातही सहभागी आहेत.
संबंधित बातम्या :
हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा : सिंधुताई सपकाळ
मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे डीन
(Harvard Business School Dean Srikant Datar receives Padmashree)