पुणे: सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीनं पुण्यातील उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर 21 जूनपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्राध्यपक भरती आणि मासिक मानधन पद्धत बंद करुन समान वेतन धोरण जाहीर करावे, या मागणीसाठी सीएचबी तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उद्या पुण्यात येऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. सामंत यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली आहे. (Higher and Technical Education Minister Uday Samant will visit Protesters CHB Professor at Pune)
शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करुन, “रविवारी सकाळी पुणे येथे चालू असल्या प्राध्यापक भरती संदर्भात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेऊन भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि तासिका प्राध्यापकांचे तसेच अन्य प्रश्ना संदर्भात पुण्यातच बैठक घेणार” असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.
रविवारी सकाळी पुणे येथे चालू असल्या प्राध्यापक भरती संदर्भात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेऊन भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि तासिका प्राध्यापकांचे तसेच अन्य प्रश्ना संदर्भात पुण्यातच बैठक घेणार.
— Uday Samant (@samant_uday) June 24, 2021
महाराष्ट्र सरकारनं प्राध्यापक भरतीवर बंदी घातलेली आहे. पुण्यात आंदोलन करणाऱ्या सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या आंदोलकांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भेट घेणार आहेत. या भेटीत प्राध्यापक भरती आणि तासिका प्राध्यापकांचा प्रश्न सुटणार का हे पाहावं लागणार आहे.
सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समिती या संघटनेच्या वतीनं पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन 21 जून पासून करण्यात येत आहे. पुण्यात आंदोलन करणाऱ्या या प्राध्यापकांना विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देखील दिला आहे. प्राध्यापक भरती सुरु करावी आणि इतर राज्यांच्या धरतीवर मासिक भत्ता बंद करून समान वेतन धोरण जाहीर करा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. बेमुदत धरणे आंदोलनाला युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी देखील भेट दिली होती.
पुण्यामध्ये 2018 मध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनानंतर सीएचबी तत्वावरील प्राध्यपकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी तासिका तत्वावरील शिक्षकांना प्रती तासिका 240 रुपयांप्रमाणं वार्षिक 210 तासांची रक्कम दिली जायची. राज्य सरकारनं 2018 मध्ये शासन आदेश काढून मानधनात वाढ केली. 60 मिनिटांच्या तासिकेसाठी 500 रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. मात्र, महाविद्यालयीन तासिकांची वेळ 48 मिनिटांची असल्यानं त्या प्रमाणात मानधन निश्चित करण्यात येते. संबंधित शासन आदेशात तासिका तत्वावरील शिक्षकांना दरमहा मानधन देण्यात यावं असा उल्लेख करण्यात आला होता. मानधनामध्ये वाढ देखील करण्यात आली होती. मात्र, सीएचबीवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना दरमहा मानधन दिलं गेल्याचं समोर आलेलं नाही.
दरम्यान, वेळेवर न मिळणारं तटपुंजं मानधन, रखडलेली प्राध्यापक भरती या सर्व प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी पुण्यात सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीनं 21 जूनपासून आंदोलन सुरु केलं आहे.उदय सामंत उद्या आंदोलकांची भेट घेत आहेत. त्यामध्ये कोणता मार्ग निघतो पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या:
नाशिकमध्ये वाढीव शाळा फीचा वाद पेटला, पालकांची आक्रमक भूमिका, पोलिसांची मध्यस्थी
(Higher and Technical Education Minister Uday Samant will visit Protesters CHB Professor at Pune)