पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ने आज 17 जुलै रोजी ICSE 10वीचा निकाल जाहीर (10th Exam Result) केला आहे. निकाल अधिकृत वेबसाइट cisce.org वर उपलब्ध आहे. विद्यार्थी आवश्यक माहिती भरून निकाल तपासू शकतात. यासोबतच बोर्डाने टॉपर्सची यादीही जाहीर (ICSE Toppers 2022) केली आहे. परीक्षेत एकूण 99.97% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ज्यामध्ये 3 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकावर स्थान पटकावले आहे. ICSE इयत्ता 10वी परीक्षा 2022 मधील टॉपर्स हरगुन कौर मथारू, अनिका गुप्ता, पुष्कर त्रिपाठी आणि कनिष्क मित्तल आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ICSE परीक्षेत 499 गुणांसह 99.80 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. टॉपर हरगुन कौर मथारू ही महाराष्ट्रातील पुण्याची आहे. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कठीण परिश्रमाशिवाय कोणतेही यश प्राप्त होत नाही. पुण्याला शिक्षणाचं, विद्येचे माहेरघर म्हणून पाहिलं जातं. त्या पुण्यात शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येतात, फक्त भारतातूनच नाही तर विदेशातील विद्यार्थ्यांचा ओढा ही पुण्याकडे असतो. कारण पुण्यातल्या शिक्षणाचा दर्जा तेवढा चांगला आहे. त्यामुळेच पुण्याने अनेक उज्वल विद्यार्थी घडवले आहेत. हरगुनचे या यशाने पुण्याला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. दहावी बारावीची परीक्षा आणि त्यांचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पुढील शिक्षणाची दिशा याच निकालावर ठरवली जाते. मात्र हा निकाल चांगला लागला तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढतो. हरगुनच्या बाबतीतही आता तेच झालं आहे. पुढील शिक्षणासाठी तिला आणखी उत्साहाने पुढे जाता येणार आहे. तिच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा सध्या वर्षाव होऊ लागला आहे.