कोल्हापूर: संपूर्ण गावाने एखादी गोष्ट ठरवली तरी कोणत्याही अडचणींवर मात करत असाध्य गोष्ट साध्य करता येते. कोल्हापूर जिल्ह्यातील हे करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील या ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कणेरीवाडी ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावातील प्राथमिक शाळेचं नुसतं रुपच बदल नाही तर ही शाळा डिजीटल झालीय. पहिली ते सातवी पर्यंत 24 वर्ग डिजीटल असणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषदेची शाळा ठरलीय. कणेरीवाडीची शाळा राज्यातील सर्वाधिक पटसंख्या असणारी शाळा आहे. (Kaneriwadi Villagers converted ZP School into Digital School)
कणेरीवाडीच्या जिल्हा प्राथमिक शाळेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या अभ्यासपूर्ण माहितीने भिंतीवर रेखाटलेली ही चित्र पाहायला मिळतात. या शाळेतील सुसज्य वर्गखोल्या,अत्याधुनिक पद्धतीने तयार झालेला संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा पाहून आपल्याला क्षणभर ही एखाद्या खाजगी शिक्षण संस्थेची शाळा आहे असं वाटेल. पण तसं नाहीये, ही शाळा कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत चालवली जाते. आता तुम्हाला वाटेल की ही जिल्हा परिषद शाळा असूनही इतक्या सुसज्ज अवस्थेत कशी? या शाळेला भला मोठा निधी मिळाला असेल असा अंदाज जर तुम्ही बांधत असाल तर तुम्ही पुन्हा एकदा चुकताय. कारण कणेरीवाडी ग्रामस्थांच्या सहभागातून लॉकडाऊनच्या काळात शाळेच हे रूप पालटलं आहे.
राज्यात सर्वाधिक पटसंख्या असलेली प्राथमिक शाळा अशी या कणेरीवाडी शाळेची ओळख आहे. याचं शाळेन आता डिजीटल रूप धारण केलंय. पहिली ते सातवी पर्यंतच्या 24 खोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय हे सगळं आता नव्या रुपात विद्यार्थ्यांसमोर आलंय, असं कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी सांगितले. कणेरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत 713 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी चमकत आहेत.
प्राथमिक शाळेची दुरवस्था पाहता याविषयी चर्चा करण्यासाठी लॉकडाऊन काळात गावचे प्रतिनिधी, शिक्षक आणि पालकांची बैठक झाली. त्या बैठकीत शाळेला डिजिटल रूप देण्याचा मुद्दा समोर आला. लोकवर्गणी काढताना कोणी पाचशे आणि हजार तर कोणी पाच लाखांपर्यंतची देणगी दिली. पाहता पाहता जवळपास 30 लाख रुपये खर्च करून ही संपूर्ण शाळा डिजीटल बनलीय, असं शिक्षक विष्णू काटकर यांनी सांगितले.
कोरोनामुळे शाळा गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहेत. आता शाळा पुन्हा सुरु होत असताना शाळेत आलेले विद्यार्थी शाळेचं पालटलेलं रुप पाहून भारावून जात आहेत. शाळेमध्ये ग्रामस्थांच्या एकजूटीतून झालेल्या बदलामुळे आनंद वाटतोय, असं सातवीमध्ये शिकणाऱ्या संध्या गुरव या विद्यार्थिनीनं सांगितले.
राज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण#NarendraModi #CoronaVaccine #VaccineForIndia #vaccinationCovid #vaccination https://t.co/Vw6gM5j8LI
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2021
संबंधित बातम्या:
काचेच्या भिंती, झिरो एनर्जी खोल्या, झेडपीच्या ‘या’ शाळेत प्रवेशासाठी 4 हजार विद्यार्थी वेटिंगवर
(Kaneriwadi Villagers converted ZP School into Digital School)