मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (8 जून, दुपारी 1 वाजता) लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Results 2022 Date) याच आठवड्यात लागणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. 8 जून किंवा 9 जून रोजी कोणत्याही क्षणी बारावीचा निकाल (HSC Result Live) लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर 8 जून रोजी हा निकाल लागेल, असं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आधीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थी पालकांचं हे बारावीच्या निकालाच्या लक्ष लागलेलं होतं. विद्यार्थ्यांची (HSC result News) धाकधूकही वाढली होती. अखेर बुधवारी दुपारी हा निकाल जाहीर केला जाणार आहे.
यावेळचा बारावीचा निकाल जरा खास आहे. 2 वर्ष कोरोना महामारी, दोन्ही वर्ष दहावी आणि बारावी दोन्हीच्या परीक्षाही ऑनलाईन आणि निकालही ऑनलाईन. यावेळी मात्र महामारी नंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यानंतर पेपर तपासणीवर बहिष्कार सारख्या बऱ्याच अडचणींना सामोरं जात अखेर ठरलं की बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लावायचा. त्यानुसार बुधवारी निकाल लागणार असून आता पालकांसह विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेची सवय सुटली म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिकचा वेळ देण्यात आला. दरम्यानच्या काळात कॉलेज ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन या कारणांमुळे तर विद्यार्थ्यांनी आंदोलनं देखील केली. पण परीक्षाही ऑफलाईन झाल्या आणि आता निकालही कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यताय. कोरोना ही जागतिक समस्या, तिचा जर जगावर परिणाम झालाय तर विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवर देखील होणारच. कोरोना सारख्या महामारीनंतर विद्यार्थ्यांचा निकाल, राज्यातल्या एकूणच निकालाची परिस्थिती यासाठी हा निकाल खास आहे. या सगळ्याचा मिळून परिणाम पुढच्या शिक्षणासाठीच्या प्रवेशांवर होणार आहे.
जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार, अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आधीच दिली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलंय. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थी आणि पालकांना लाईव्ह पाहायला मिळू शकणार आहे.